अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा भव्य अन् आलिशान 'महाल'; २०० वर्ष जुना ऐतिहासिक वारसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 11:17 IST2025-02-13T11:13:22+5:302025-02-13T11:17:43+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वेळेनुसार गुरुवारी सकाळी अमेरिकेच्या दौऱ्यावर पोहचले. नरेंद्र मोदी अमेरिकेत ३६ तास राहणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांच्या राहण्याची व्यवस्था अमेरिकन सरकारने वॉशिंग्टनच्या ऐतिहासिक ब्लेयर हाऊसमध्ये केली आहे.

हे ठिकाणी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या व्हाईट हाऊस या इमारतीसमोर आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे खास पाहुणे इथं राहतात. या ऐतिहासिक इमारतीचा २०० वर्षाहून अधिक जुना आणि रंजक इतिहास आहे. ब्लेयर हाऊसमध्ये क्वीन एलिजाबेथ विंस्टन चर्चिल आणि व्लादीमीर पुतिनसारखे जगातील अनेक बडे नेत्यांनी पाहुणचार घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनापूर्वी ब्लेयर हाऊसवर भारतीय तिरंगा फडकवण्यात आला. मोदींचं उत्साहात स्वागत करण्यात आले. ब्लेयर हाऊस ही एकेकाळी खासगी मालमत्ता होती जी प्रसिद्ध सर्जनने बनवली होती आणि त्यानंतर ही विकण्यात आली. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे गेस्ट हाऊस बनण्यात चर्चिल यांच्या सिगार पिण्याचा किस्साही महत्त्वाचं कारण आहे.

वॉशिंग्टनच्या डीसीत ब्लेयर हाऊस पेंसिलवेनिया एवेन्यू व्हाईट हाऊससमोर आहे. सध्या ते अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे गेस्ट हाऊस म्हणून ओळखले जात असले तरी पूर्वी त्याची ओळख तशी नव्हती. सुंदर पाश्चात्य शैलीची ही इमारत १८२४ साली अमेरिकेतील डॉक्टर जोसेफ लवेल यांनी बनवली होती.

१८३७ साली फ्रेकफोर्टच्या फ्रान्सिस प्रेस्टन ब्लेयर यांनी ६५०० अमेरिकन डॉलर म्हणजे ५.६४ लाखाला ही वास्तू खरेदी केली. ब्लेयर यांच्या नावावरच व्हाईट हाऊस समोरील या वास्तूचे नाव पडले. ब्लेयर हाऊस पुढील १०० वर्ष त्यांच्याच कुटुंबाकडे होते. १९४२ साली अमेरिकन सरकारने राष्ट्राध्यक्षांच्या पाहुण्यांसाठी या वास्तूचा वापर व्हावा म्हणून ब्लेयर हाऊस खरेदी केले.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश पंतप्रधान विंस्टन चर्चिल सातत्याने वॉशिंग्टन दौरा करायचे. त्यावेळी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रॅकलिन रूजवेल्ट यांना परदेशी पाहुण्यासाठी एका खास जागेची गरज भासली. तोपर्यंत परदेशी पाहुणे व्हाईट हाऊसमध्येच राहायचे. एकदा रात्री रूजवेल्ट यांनी चर्चिल यांना हातात सिगार घेऊन व्हाईट हाऊसमध्ये फिरताना पाहिले.

याच घटनेमुळे रूजवेल्ट यांनी ब्लेयर हाऊसला त्यांच्या पूर्ण सामानसह खरेदी करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून ते पाहुण्यांसाठी गेस्ट हाऊस बनेल. ब्लेयर हाऊस ७०,००० चौरस फूट परिसरात पसरलेले आहे. हे एक घर नाही तर ४ टाऊनहाऊस एकत्र केलेत. त्यात ११९ खोल्या असून त्यातील १४ गेस्ट बेडरूम आहे.

ब्लेयर हाऊसमध्ये ३५ बाथरूम, ३ डायनिंग रूम आणि एक सुसज्ज ब्यूटी सलून आहे. ब्लेयर हाऊस कुठल्याही पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही. या वास्तूचा ऐतिहासिक वारसा आजही जपून ठेवला आहे. ब्लेयर हाऊसने आजवर जगातील मोठी राजघराणी, जागतिक नेत्यांचा पाहुणचार केला आहे.