नायजेरियात दहशतवाद्यांकडून 110 जणांचा 'कत्लेआम'; पुरुषांची गळा चिरून हत्या, महिलांना पळून नेलं

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 30, 2020 02:01 PM2020-11-30T14:01:45+5:302020-11-30T14:16:00+5:30

नायजेरियातील दहशतवादी संघटना बोको हरमने मोठे हत्याकांड घडवून आणले आहे. यात 110 लोकांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये अधिकांश शेतकरी आणि मच्छिमारांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी या नागरिकांचे शीर कापले आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार या हल्ल्यास बोको हराम या दहशतवादी संघटनेला जबाबदार धरण्यात आले आहे.

बोको हरम दहशतवादी संघटनेच्या एका गटाने केलेल्या या हल्ल्यात सर्व पुरुषांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. यानंतर या दहशतवाद्यांनी मृतांच्या पत्नी आणि मुलींनाही पळवून नेले आहे.

ही घटना नायजेरियाच्या बोर्नो राज्यात घडली. रविवारी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नायजेरियातील संयुक्त राष्ट्राचे समन्वयक अॅडवर्ड कल्‍लोन यांनी या घटनेत किमान 110 लोकांची हत्या झाल्याची पुष्टी केली आहे. या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत.

येथील मैदूगुरी शहरापासून जवळच असलेल्या कोशोबेजवळ ही घटना घडली आहे. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर अचानकपणे एका टोळीने हल्ला केला.

अॅडवर्ड कल्लोन यांनी सांगितले, की शस्त्रधारी हल्लेखोर दुचाकीने आले होते. सुरुवातीला केवळ 43 मृतदेह सापडले होते. मात्र, यानंतर शनिवारी आणखी 70 जणांचे मृतदेह आढळून आले.

कल्लोन यांनी म्हटले आहे, की सर्व सामान्य नागरिकांवर करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. तसेच हा हल्ला अत्यंत धक्कादायक आहे. त्यांनी मागणी केली, की हल्ले खोरांवर कठोर कारवाई व्हायला हवी.

अल जजीराने दिलेल्या वृत्तानुसार हे मजूर शेतात काम करत होते. त्याच वेळी अचानकपणे दहशतवादी तेथे आले आणि त्यांनी या मजुरांना बांधून त्यांची गळा चिरून हत्या केली.

नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी, गेल्या महिन्यातही दोन वेग-वेगळ्या घटनांमध्ये बोको हरामच्या दहशतवाद्यांनी 22 शेतकऱ्यांची हत्या केली होती.

कल्लोन यांनी म्हटले आहे, की यापूर्वीही बोको हरामने, असे अनेक हल्ले केले आहेत. हत्या करण्यात आलेले हे सर्व मजूर सोकोटो राज्यातील आहेत. ते कामाच्या शोधार्थ येथे आले होते.

सर्व मृतदेह जाबरमारी गावात नेण्यात आले आहेत. तेथे त्यांना रविवारी दफन करण्यापूर्वी ठेवण्यात आले. 2009पासून आतापर्यंत जवळपास 36 हजार जणांचा जिहादी वादात मृत्यू झाला असून 20 लाखहून अधिक जण विस्थापित झाले आहेत.