लग्नाच्या पहिल्याच रात्री १८ वर्षांच्या तरुणीचा मृत्यू; शरीर संबंधांदरम्यान घडला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 03:25 PM2021-06-15T15:25:26+5:302021-06-15T15:30:56+5:30

सुखी संसाराच्या स्वप्नांना धक्का; लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहितेचा मृत्यू

लग्नानंतरची पहिली रात्र खूप महत्त्वाची असते. या रात्री पती-पत्नीमधील जवळीक वाढते. मात्र ब्राझीलमधील एका नवदाम्पत्यासाठी लग्नानंतरची पहिली रात्र काळरात्र ठरली. संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच दाम्पत्याची सर्व स्वप्नं धुळीला मिळाली.

ब्राझीलमध्ये लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहितेचा मृत्यू झाला. यामुळे पतीला मोठा धक्का बसला. ब्राझीलच्या इबिराइट शहरात ही घटना घडली.

१८ वर्षांच्या तरुणीचा विवाह २९ वर्षांच्या तरुणासोबत संपन्न झाला. दोघांचं कुटुंब आनंदात होतं. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री तरुणीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या रात्री शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीची प्रकृती अचानक बिघडली. पतीला काही कळण्याआधीच ती कोसळली. हा संपूर्ण प्रकार पाहून पतीला धक्काच बसला.

पतीनं पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. पत्नीला घेऊन तो रस्त्यापर्यंत आला. मात्र टॅक्सी चालकांनी रुग्णालयात नेण्यास नकार दिला. त्यामुळे बराच वेळ वाया गेला.

पतीनं रुग्णवाहिकेसाठी फोन केला. रुग्णवाहिकेसोबत वैद्यकीय कर्मचारी पोहोचले, त्यावेळी नवविवाहितेचा श्वास सुरू होता. मात्र त्यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागत होता.

नवविवाहितेला हृदयविकाराचा झटका आल्याचं महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यानं सांगितलं. महिलेला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं जातं होतं. मात्र रस्त्यातच तिनं अखेरचा श्वास घेतला.

नवविवाहितेच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आलं. मृत तरुणीला ब्रोंकाइटिस नावाचा आजार असल्याची माहिती त्यातून समोर आली. यामुळे श्वसन नलिकेत अडथळे निर्माण होऊन श्वास घेण्यात समस्या निर्माण होतात.

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तरुणीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमांच्या खुणा नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. तरुणीच्या मृत्यूआधी आपण कोणत्याही प्रकारचे आवाज ऐकले नाहीत, अशी माहिती शेजारच्यांनी पोलिसांना दिली.

Read in English