Facebookप्रमाणेच जगभरातील Internet सात तास डाऊन होऊ शकतं का? समोर आली अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 06:30 PM2021-10-05T18:30:13+5:302021-10-05T18:39:41+5:30

Internet: काल रात्रीपासून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची जगभरातील सेवा सुमारे सात तासांपर्यंत ठप्प झालेली होती. त्यानंतर आता फेसबुकप्रमाणेच जगभरातील इंटरनेट एकाच वेळी बंद होऊ शकते का? असा कुतुहलात्मक प्रश्न विचारला जात आहे. त्याचं उत्तरही समोर आलं आहे.

काल रात्रीपासून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची जगभरातील सेवा सुमारे सात तासांपर्यंत ठप्प झालेली होती. फेसबुकने नेमक्या कुठल्या कारणामुळे एवढा वेळ सेवा बंद राहिली, हे सांगितलेले नाही. मात्र तज्ज्ञांनी यामागे नेमके कोणते कारण होते, याचा उलगडा केला आहे. आता फेसबुकप्रमाणेच जगभरातील इंटरनेट एकाच वेळी बंद होऊ शकते का? असा कुतुहलात्मक प्रश्न विचारला जात आहे. त्याचं उत्तरही समोर आलं आहे.

अशाप्रकारे जगभरातील इंटरनेट सेवा एकाच वेळी बंद होणे जवळपास अशक्य आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इंटरनेटचं व्यवस्थापन हे कुठलीही एक कंपनी करत नाही. तर इंटरनेट हे सरकार आणि इतर व्यावसायिक संस्था मॅनेज करत असतात. त्याशिवाय अब्जावधी लोकही इंटरनेट सुरळीत राहावे, यासाठी मदत करत असतात.

जगामध्ये इंटरनेट बंद करता येईल असा कुठलाही एक सिंगल पॉईंट नाही आहे. इंटरनेट ट्रॅफिक फ्लो हा कुठल्याही एका जागेवरून येत नाही, तर तो मल्टिपल लोकेशनवरून येत असतो. मात्र अनेकदा असे पाहण्यात आले आहे की, अनेक देशातील बहुतांश ठिकाणी इंटरनेट बंद झाल्याचे दिसून येते. कधीकधी सरकार राज्यांमध्ये इंटरनेट बंद करते. भारतामध्येही अनेक राज्यांमध्ये विशेषकरून जम्मू काश्मीरमध्ये काही प्रक्षोभक घटना घडल्यानंतर इंटरनेट बंद करण्यात आल्याचे तुम्ही पाहिले असेल.

टेलिकॉम कंपनी किंवा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर तुमच्यापर्यंत इंटरनेट पोहोचवत असतात. अशा परिस्थितीत जर सरकारने या कंपन्यांना तुम्हाला इंटरनेट पुरवू नका असे आदेश दिले तर तुम्हाला इंटरनेट मिळणार नाही.

२०११ मध्ये इजिप्तमध्ये क्रांतीदरम्यान, सरकारने तेथील चारही नॅशनल इंटरनेट सर्व्हिसना डोमेन नेम सिस्टिम बंद करण्याचे आदेश दिले होते. ब्रिटनमध्ये राष्ट्रीय आपत्तीवेळी देशातील इंटरनेट बंद करण्याचा अधिकार सरकारला देण्यात आलेला आहे. मात्र या अधिकाराचा अद्याप वापर करण्यात आलेला नाही.

एकंदरीत एकेका देशात इंटरनेट बंद होणे शक्य आहे. मात्र संपूर्ण जगभरात एकाच वेळी इंटरनेट ठप्प होणे शक्य नाही. एक शक्यता म्हणजे जगातील बहुतांश देशातील इंटरनेट बंद पडू शकतं. त्याचं कारण म्हणजे मायक्रोसॉफ्ट, अॅपल, गुगल, अॅमेझॉन आणि फेसबूक अशा जगातील मोठ्या कंपन्यांना तेथील सरकार आपली सेवा बंद ठेवण्यास सांगू शकते. अशा परिस्थितीत जगातील इंटरनेटवर परिणाम होऊ शकतो. त्या परिस्थितीत बहुतांश लोकांना इंटरनेट वापरता येणार नाही.

मात्र अशा परिस्थितीतसुद्धा संपूर्ण जगामध्ये एकाचवेळी इंटरनेट ठप्प होऊ शकणार नाही. कारण काही सरकारे इंटरनेटचा वापर सुरू ठेवू शकतात.