Coronavirus: कोरोना संबधित रहस्यमय रोगाचा लहान मुलांना धोका; अमेरिकेसह अनेक देश चिंतेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 10:41 AM2020-05-11T10:41:37+5:302020-05-11T12:18:04+5:30

अमेरिकेत कोरोना विषाणूशी संबंधित असलेल्या दुर्मिळ आजारामुळे प्रशासन अस्वस्थ झाले आहे. न्यूयॉर्कचे राज्यपाल अँड्र्यू क्वोमो यांनी म्हटले आहे की, हा कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार आहे. यामुळे, मुलांसमोर आव्हान निर्माण झालं आहे. न्यूयॉर्क राज्यात ७३ रुग्ण आढळून आले आहेत. पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

क्वोमोने लिहिले की, राज्य आरोग्य विभाग या मुलाच्या मृत्यूमागील कारणे शोधत आहे. आरोग्य विभागाने सर्व पालकांना सतर्क केले आहे ज्यांच्या मुलांमध्ये अशा आजारांची लक्षणे आढळत आहेत. जर एखाद्या मुलास पाच दिवसांपेक्षा जास्त काळ ताप असेल तर ताबडतोब त्याला दवाखान्यात घेऊन जा असा सल्ला त्यांनी दिला आहे.

अतिसार, उलट्या होणे, श्वास घेण्यात अडचण येणे, त्वचेचा रंग बदलणे, छातीत दुखणे आणि थकवा या आजाराची इतर लक्षणे आहेत. कावासाकी हा एक रहस्यमय रोग आहे ज्यामुळे ५ वर्षांच्या मुलांच्या नसा फुगतात. ताप येतो. त्वचेवर डाग येतात. सांधेदुखी असते असं क्वोमोने सांगितले.

क्वोमोने इशारा दिला आहे की, मुलांवर योग्य वेळी उपचार न केल्यास मृत्यू देखील होऊ शकतो. परंतु उपचार योग्य वेळी मिळाल्यास मुलं या आजारापासून वाचू शकतात.

दुसरीकडे, ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने गेल्या महिन्यातच या आजाराचा इशारा दिला होता. तेथेही कोरोना विषाणूमुळे पीडित मुलांमध्ये टॉक्सिस शॉक सिंड्रोम आणि कावासाकी रोगाची लक्षणे आढळली. हे सर्व रोग एकाच वेळी मुलांवर हल्ला करीत होते. फ्रान्स, इटली आणि स्पेनमध्येही अशी काही रुग्णे आढळली आहेत.

क्वोमोने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, न्यूयॉर्कमध्ये झालेल्या या मुलाचा मृत्यूमागे दुर्मिळ आजार कावासाकी रोग आणि टॉक्सिक शॉक सारख्या सिंड्रोमसारखे लक्षणे आढळतात. अलीकडेच, पाच वर्षांच्या मुलाचा अशाच आजाराने मृत्यू झाला. ज्याच्यामागे कोविड १९ कारण होतं.

कावासाकी उपचार करुन बरा केला जाऊ शकतो. यात, मुलांच्या नसामध्ये इम्यूनोग्लोबुलिन आणि एस्पिरिन दिले जातात. यातून बरीच मुले बरे होतात. तथापि, कोरोनाव्हायरसशी या आजाराचा कोणताही संबंध आढळला नाही.

द लाँसेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ब्रिटिश डॉक्टरांनी लंडनमध्ये ८ मुलांवर उपचार केले. या मुलांमध्ये एसीम्प्टोमॅटिक कोरोनाव्हायरस तसेच हायपरइन्फ्लेमेटरी सिंड्रोम होते. काही मुले बरे झाली पण काहींचा मृत्यू झाला.

न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू क्वोमो यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणू आणि कावासाकी रोगामध्ये जर संबंध झाला तर ते अत्यंत भयानक आहे. हे आपल्याला नवीन रोगाकडे नेईल. ज्याचा उपचार करणे अधिक कठीण होईल.

त्यामुळे या आजाराने अमेरिकेतील आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान निर्माण केले आहे.