तारेचे कुंपण अन् त्यात करंट, देशातून पळून जाणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी चीनचे अजब प्रयत्न By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 07:06 PM 2022-12-22T19:06:41+5:30 2022-12-22T19:09:04+5:30
कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती भयावह बनत चालली आहे. अशीच स्थिती राहिल्यास येत्या काही महिन्यांत लाखो लोकांना संसर्ग होऊन हजारो लोकांचा मृत्यू होण्याची भीती आहे. China Corona: कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती भयावह बनत चालली आहे. अशीच स्थिती राहिल्यास येत्या काही महिन्यांत लाखो लोकांना संसर्ग होऊन हजारो लोकांचा मृत्यू होण्याची भीती आहे. अशा परिस्थितीमुळे लोक आता देश सोडून पळू लागले आहेत. चीनच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी हजारो मैलांवर चीनी सरकारने एक विचित्र पद्धत अवलंबली आहे.
चीनला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कोरोना लाटेचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी जागाच शिल्लक नाही, स्मशानभूमीबाहेर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अशा वातावरणामुळे लोक घाबरले आहेत. लोक देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. युनान प्रांतात अशाच घटना घडत आहेत. चीनने सीमा ओलांडणाऱ्यांना पकडण्यासाठी हजारो सीमा गस्ती एजंट तैनात केले आहेत.
युनान असा प्रांत आहे, ज्याची सीमा तीन देशांना लागते. झिरो कोविड धोरणाच्या अंमलबजावणीनंतर, या प्रांताची सीमा सुरक्षा कडक करण्यात आली आहे. विशेषत: रुईली शहरात, म्यानमारच्या सीमेला लागून असलेले शहर असल्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सीमा ओलांडणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे, अलार्म, मोशन सेन्सर आणि विद्युतीय कुंपण बसवण्यात आले आहे.
2020 मध्ये चीनने त्यांच्या वाढत्या कोविड प्रकरणांचा संपवण्याच्या नावाखाली दक्षिण सीमेजवळ विद्युतीकृत कुंपण बांधण्यास सुरुवात केली. हा भाग लाओस, व्हिएतनाम आणि म्यानमारला लागून आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CCP) ने यापूर्वी याचे वर्णन तात्पुरते कुंपण म्हणून केले होते, परंतु आता येथील सुरक्षा रचनेत मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CCP) ने युनान प्रांताला कव्हर करत बॉर्डर एपिडेमिक प्रिव्हेंशन आणि कंट्रोल डिपार्टमेंट नव्याने बांधलेल्या कुंपणासह सुरक्षा वाढवण्यात आघाडीवर आहे. बर्लिनने ज्याप्रमाणे सीमेवर भिंत बांधली आहे, त्याचप्रमाणे चीननेही औपचारिक सल्लामसलत न करता 3,000 मैलांचे कुंपण बांधले आहे.
2021 मध्ये व्हिएतनामी ट्रॅव्हल ब्लॉगरने यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते की चीन-व्हिएतनाम सीमा क्षेत्र कुंपणाने झाकलेले आहे. याशिवाय चीनने तेथे मॉनिटरिंग पोस्टही बनवली आहे. याशिवाय तेथे पाळत ठेवणारे कॅमेरे आणि सोलर पॅनलही बसवण्यात आले आहेत.
दक्षिणेकडील सीमावर्ती भागाच्या आसपास चीनने गेल्या अनेक वर्षांत अनेक सुरक्षा पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. या वास्तूंमध्ये सीमेजवळ बोगदे खोदले जाऊ नयेत म्हणून जमिनीच्या आत रेझर वायर इलेक्ट्रोफाइल कुंपणही बसवण्यात आले आहे. एवढेच नाही तर येथे निगराणी कॅमेरे, मोशन सेन्सर आणि अलार्म, सर्चलाइट्ससह बांबू बॅरिकेड्सही लावण्यात आले आहेत.