CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! चीनमध्ये परिस्थिती गंभीर, लस ठरतेय फेल; लोकांच्या संतापाचा उद्रेक, केला निषेध By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 12:41 PM 2022-03-26T12:41:45+5:30 2022-03-26T13:05:07+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोट्यवधी लोकांना कोरोनाची लस दिल्याचा दावा करणाऱ्या चीनची ही लसही फेल ठरत आहे. यामुळेच चीनचे लोक आता ऑनलाईन आपला राग व्यक्त करत आहेत. वुहानमध्ये साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, चीनमधील लोकांना गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसचा सामना करावा लागत आहे आणि आता त्यांना यापासून सुटका मिळण्याची कोणतीही आशा दिसत नाही.
कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी चीनने जगातील सर्वात कठोर शून्य कोविड धोरण लागू केले आहे. याशिवाय चीनने सीमेवर कडक निर्बंध घातले आहेत, मोठ्या प्रमाणावर डिजिटल ट्रॅकिंग आणि चाचणी करत आहे.
जग जेव्हा या महामारीच्या विळख्यात सापडले होते, तेव्हा चीनचा बचाव झाला होता, परंतु आता कोरोना प्रकोपावर नियंत्रण मिळवण्यात तो असमर्थ असल्याचं दिसून येत आहे. देशातील कोट्यवधी लोक लॉकडाऊनमध्ये आहेत.
कोट्यवधी लोकांना कोरोनाची लस दिल्याचा दावा करणाऱ्या चीनची ही लसही फेल ठरत आहे. यामुळेच चीनचे लोक आता ऑनलाईन आपला राग व्यक्त करत आहेत. एवढेच नाही तर चीनच्या शून्य कोविड धोरणावर प्रथमच मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
चीनचे टेक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेनझेन शहरात रविवारी लोकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. हे लोक शहरात खूप दिवसांपासून असलेल्या लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलन करत होते.
एक आंदोलक म्हणाला, 'तुम्ही असं करू शकत नाही. आम्हाला अन्नपदार्थांची आणि भाडेही द्यावे लागेल. दुसऱ्या एका आंदोलकाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो सर्व ओपन करा असं म्हणताना दिसत आहे.
जगभरातील कोरोना व्हायरसची प्रकरणे 47.86 कोटींवर पोहोचली आहेत. या महामारीमुळे आतापर्यंत 61.1 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 10.86 अब्जाहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने ही आकडेवारी शेअर केली आहे. शनिवारी सकाळी नवीन अपडेट्समध्ये असे म्हटले आहे की सध्याची जागतिक प्रकरणे, मृत्यू आणि लसीकरणाची एकूण संख्या अनुक्रमे 478,619,889, 6,113,687 आणि 10,860,311,810 पर्यंत वाढली आहे.
CSSE नुसार, अमेरिका हा सर्वाधिक प्रभावित देश राहिला आहे ज्यामध्ये जगातील सर्वाधिक प्रकरणे आणि मृत्यू 79,936,775 आणि 976,499 आहेत. कोरोनाने जगाची चिंता वाढवली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चीनच्या वुहानमधून कोरोनाचा वेगाने प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे.
चीनने जगाचं टेन्शन वाढवलं असून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. चिनी मीडियानुसार, महामारीच्या सुरुवातीस वुहानमध्ये उद्रेक झाल्यानंतर आता देशात एकाच दिवसात सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.
चीनमध्ये प्रशासनाने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनसारखे निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. शेनझेन शहरात कोरोना लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानंतर शहरात राहणारे 1.7 कोटी लोक त्यांच्या घरात बंद झाले आहेत.
शांघायमध्ये शाळा आणि उद्याने बंद करण्यात आली आहेत, तर बीजिंगमध्ये निवासी भागात प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. नवीन प्रकरणे प्राप्त झाल्यानंतर, बीजिंगमधील प्रशासनाने लोकांना घराबाहेर न पडण्यास सांगितले.
चीनने म्हटलं आहे की इतकी प्रकरणे म्हणजे कोविड शून्य धोरणाला मोठा धक्का आहे. त्याचबरोबर चीनमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर इतर देशही सतर्क झाले असून त्यांनी नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.