पुढच्या पाच वर्षांत दरवर्षी एक कोटीने कमी होणार चीनची लोकसंख्या, तज्ज्ञांनी सांगितलं कारण By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 05:18 PM 2021-04-19T17:18:03+5:30 2021-04-19T17:26:57+5:30
China's population : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असा चीनचा लौकिक आहे. चीनची लोकसंख्या सुमारे १४० कोटी एवढी आहे. मात्र तज्ज्ञांनी आता चीनच्या लोकसंख्येबाबत महत्त्वपूर्ण दावा केला आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असा चीनचा लौकिक आहे. चीनची लोकसंख्या सुमारे १४० कोटी एवढी आहे. मात्र तज्ज्ञांनी आता चीनच्या लोकसंख्येबाबत महत्त्वपूर्ण दावा केला आहे.
पुढील पाच वर्षांत चीनची लोकसंख्या दरवर्षी एक कोटी या दराने कमी होण्याची शक्यता आहे. हा दावा चीनमधील गुआंगडोंग अॅकॅडमी ऑफ पॉप्युलेशन डेव्हलपमेंटचे संचालक डोंग युझेंग यांनी केला आहे. एका स्थानिक प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
डोंग युझेंग यांनी सांगितले की, चीनची लोकसंख्या पुढच्या काही वर्षांमध्ये घटण्यास सुरुवात होईल. २०१९ मध्ये चीनमध्ये १ कोटी ४६ लाख मुलांचा जन्म झाला होता. १९४९ नंतर आतापर्यंतचा हा सर्वात कमी जन्मदर ठरला होता. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये ५.८० लाख कमी मुले जन्माला आली. ही आकडेवारी चीनमधील नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटेस्टिकने संकलित केली आहे.
सर्वसाधारणपणे चीनकडून आपल्या लोकसंख्येसंबंधी आकडेवारी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सादर केली जाते. मात्र चीनने आतापर्यंत गेल्या वर्षीच्या जन्मदराची माहिती दिलेली नाही. सध्या जन्मदरातील घट ही चीनसाठी चिंतेची बाब बनली आहे. देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. तसेच चीनमधील लोक लोकसंख्येच्या तुलनेत कमाई करू शकतात, किंवा आपल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेऊ शकतात, असा सवाल विचारला जात आहे.
२०१६ मध्ये चीनने अनेक दशकांपासून चालत आलेले एक मूल धोरण सोडून दिले आहे. तत्पूर्वी एकापेक्षा अधिक मुले जन्माला घातल्यास युवा जोडप्यांवर कारवाई करण्यात येत असे. जास्त मुलांमुळे आरोग्य, शिक्षण आणि घरखर्चामध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात येत असे.
चीनच्या पब्लिक सिक्युरिटी मिनिस्ट्रीच्या आकडेवारीवर विश्वास ठेवल्यास गेल्या वर्षी चीनमधील जन्मदरात १५ टक्क्यांनी घट झाली. म्हणजेच या वर्षात १ कोटींपेक्षा काही अधिक मुलांचा जन्म झाला. तर २०१९ मध्ये १.४६ कोटी मुले जन्मास आली होती. मात्र तज्ज्ञांच्या मते २०२० मध्ये १ कोटी ते १ कोटी ४० लाख मुलांचा जन्म झाला असेल.
लेबर एक्सपर्ट लिऊ काइमिंग यांनी सांगितले की, पुढच्या वर्षापासून चीनच्या लोकसंख्येमधील वार्षिक घट एक कोटींच्या आसपास असेल. मात्र चीनने आपल्या लोकसंख्येचा डेटा प्रसिद्ध केलेला नाही. चीनच्या लोकसंख्येबाबतची आकडेवारी एप्रिलमध्ये प्रसिद्ध केली जाईल, असे आधी सांगण्यात आले होते.