Omicron Variant: ड्रॅगनला मोठा धक्का; ‘ओमायक्रॉन’विरोधात चीनची लस निकामी, जगातील अनेक देशांची चिंता वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 08:44 PM2021-12-15T20:44:48+5:302021-12-15T20:48:46+5:30

Omicron Variant: जगभरात आतापर्यंत सिनोव्हॅक निर्मित करोनोव्हॅक कोरोना लसीच्या २.३ अब्ज डोसचा वापर करण्यात आला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर डेल्टा व्हेरिएंटचा कहर जगभरात पाहायला मिळाला. डेल्टा व्हेरिएंटचा प्रभाव बहुतांश प्रमाणात ओसरत असताना ओमायक्रॉन व्हेरिएंटची (Omicron Variant) दहशत जगातील अनेक देशांमध्ये वाढत चालल्याचे सांगितले जात आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे सुरुवातील ब्रिटन आणि त्यानंतर अमेरिकेतील रुग्ण दगावल्याने यासंदर्भात जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे. यातच कोरोना लस घेण्यावर भर देण्याचे आवाहन जगातील जवळपास प्रत्येक देश आपल्या नागरिकांना करत आहेत.

मात्र, यातच जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी चीन निर्मित कोरोना लस ओमायक्रॉन व्हेरिएंटविरोधात फोल ठरत असल्याचे समोर आले आहे. यामुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. हाँगकाँगच्या संशोधकांनी आपल्या लॅबच्या सुरुवातीच्या निष्कर्षाच्या आधारावर हा दावा केला आहे.

चीनी लस निर्माता कंपनी सिनोव्हॅक बायोटेक लिमिटेडद्वारे तयार करण्यात आलेली कोरोना लस ओमायक्रॉन व्हेरियंट विरोधात शरीरात पुरेशा अँटीबॉडीज निर्माण करण्यात सपशेल अयशस्वी ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनापासून बचावासाठी चीनी लसीवर अवलंबून असलेल्या कोट्यवधी लोकांना यामुळे मोठा धक्का बसू शकतो, असे ब्लूमबर्गने आपल्या वृत्तात म्हटले आहे. कोरोना लसीचा बुस्टर डोस ओमायक्रॉन व्हेरिएंटविरोधात लढण्यासाठी मदत करेल, असे सांगितले जात आहे.

सिनोव्हॅकची करोनोव्हॅक लस घेतलेल्या २५ जणांवर हा अभ्यास करण्यात आला. यातील एकाही व्यक्तीच्या शरीरात ओमायक्रॉन व्हेरिएंटला पछाडण्यासाठी पुरेशा अँटीबॉडीज आढळलेल्या नाहीत, असे संशोधकांनी म्हटले आहे.

याच पद्धतीने, पी फायझर इंक आणि बायोटेक एसई कडून विकसित करण्यात आलेल्या मेसेंजर आरएनए लस घेतलेल्या अन्य २५ जणांवरही अभ्यास करण्यात आला. यातील पाच व्यक्तींमध्ये ओमायक्रॉनवर मात करण्याची क्षमता आढळून आली, असे संशोधनातून समोर आल्याचे सांगितले जात आहे.

हाँगकाँग विद्यापीठातील अत्यंत प्रतिष्ठित संसर्गजन्य रोग विशेषज्ञ प्रोफेसर वोक युंग यूएन यांच्या नेतृत्वाखाली एकूण ५० जणांवर हा अभ्यास करण्यात आला. Medical Journal Clinical Infectious Diseases मध्ये या अभ्यासाचा निष्कर्ष प्रकाशित करण्यात येणार आहे.

तसेच हा अभ्यास ऑनलाइनही उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, जगभरात आतापर्यंत सिनोव्हॅक निर्मित करोनोव्हॅक कोरोना लसीच्या २.३ अब्ज डोसचा वापर करण्यात आला आहे.