चीनमध्ये लाखो लहान मुलं बेपत्ता; पाणी बॉटलच्या मदतीनं आई-वडील घेतायेत चिमुकल्यांचा शोध By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 12:59 PM 2020-07-20T12:59:25+5:30 2020-07-20T13:03:56+5:30
कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांच्या निशाण्यावर चीन आहे, वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात संकट उभं केले आहे. चीन फक्त दुसऱ्या देशांना त्रास देत नाही तर त्यांच्या स्वत:च्या देशातही अनेक समस्या निर्माण करतं.
एका रिपोर्टनुसार चीनमध्ये दरवर्षी २ लाखांहून अधिक लहान मुले बेपत्ता होतात. या मुलांचा कधी शोध लागत नाही. यात मुलांचा आणि मुलींचा दोघांचाही समावेश असतो. आता याठिकाणी बेपत्ता मुलं शोधण्यासाठी अनोखा उपाय काढला आहे.
चीनच्या सुपरमार्केटमध्ये आता पाणी बॉटलच्या मदतीनं बेपत्ता मुलांचा शोध घेतला जाणार आहे. या अनोख्या उपक्रमाचं कौतुकही अनेकजण करत आहेत. यामुळे बेपत्ता मुलांच्या पालकांनाही मोठी आशा निर्माण झाली आहे.
चीन शहराच्या क्सियन सुपरमार्केटमध्ये या पाण्याच्या बॉट्स विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, या बॉटल्सवर बेपत्ता झालेल्या मुलांचे फोटो लावण्यात आले आहेत. अगदी रेशनच्या दुकानापासून सुपरमार्केटपर्यंत या बॉटल्स विक्री करण्यात येत आहेत, त्यावर बेपत्ता मुलांची माहितीही देण्यात आली आहे.
२०१७ पासून चिनी सुपरमार्केटच्या सहाय्याने अशाप्रकारे बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात येत आहे. पाण्याच्या बॉटल्सवर बेपत्ता लहान मुलांचा फोटो लावण्याची आयडिया चीनचे मुख्य चॅरिटी कंपनी बेबी होम केअर आणि बाओ बेई फंड कडून केली जात आहे.
२०१७ पासून चीनची बेवरेज कंपनी लंक्सीअंगसोबत काम करत आहे. यात सोडा वॉटर बॉटलवर बेपत्ता मुलांचे फोटो छापण्यात येतात. त्यासोबत मुलाचे नाव, संपूर्ण माहिती दिली जाते.
या माहितीमध्ये त्या मुलाचा फोटो, जन्मतारीख, कधीपासून बेपत्ता आहे, संपर्क अशाप्रकारे माहिती असते.
या बॉटलवर खास मेसेज लिहिला जातो, तुम्ही कोणीही असाल पण आमच्या मुलांना आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी मदत करा अशी विनंती केलेली असते.
दरवर्षी चीनमध्ये २० हजार ते २ लाख मुले बेपत्ता होतात. त्यांचा कोणताही थांगपत्ता लागत नाही, यात ६४ टक्के मुलांचा समावेश असतो.
या बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी वापरण्यात आलेल्या आयडियाचं कौतुक केले जात आहे. अनेक देशातील नागरिकांनी स्वत:च्या देशातही अशाप्रकारे बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात यावा अशी मागणी त्यांच्या सरकारकडे करत आहेत.