भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 02:37 PM2024-05-14T14:37:49+5:302024-05-14T14:58:17+5:30

Indonesia Cold Lava Flash Flood : इंडोनेशियातील पश्चिम सुमात्रा येथे कोल्ड लाव्हाचा पूर आला आहे. त्यामुळे 52 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 3000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

इंडोनेशियातील पश्चिम सुमात्रा येथे कोल्ड लाव्हाचा पूर आला आहे. त्यामुळे 52 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 3000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हा काही सामान्य पूर नव्हता. यामध्ये कोल्ड लाव्हा, चिखल, पाणी, पाऊस या सर्व गोष्टी होत्या. (फोटो: एपी)

पुढील आठवड्यापर्यंत असाच पाऊस पडत राहील, असं इंडोनेशियाच्या हवामान खात्याचे म्हणणं आहे. त्यामुळे अचानक पूर येणं, भूस्खलन होणं, कोल्ड लाव्हाची शक्यता आहे. यामध्ये दगडांसोबत पाणी आणि ज्वालामुखीची राखही वाहून जाईल. (फोटो: गेटी)

पश्चिम सुमात्रामधील तीन जिल्हे कोल्ड लाव्हाच्या अचानक आलेल्या पुरामुळे त्रस्त झाले आहेत. कोल्ड लाव्हाला इंडोनेशियामध्ये लहार म्हटलं जातं. सहसा ते सक्रिय ज्वालामुखी माउंट मेरापी वरून खाली येतात. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मेरापीच्या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला होता. (फोटो: रॉयटर्स)

मेरापीमध्ये सतत स्फोट होत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला असून 45 जणांची ओळख पटली आहे. स्थानिक बचावकर्ते, पोलीस आणि लष्कराचे लोक सतत लोकांचा शोध घेत आहेत. कोल्ड लाव्हाच्या पुरामध्ये अजूनही 17 लोक बेपत्ता आहेत. (फोटो: एपी)

पश्चिम सुमात्रा आपत्ती एजन्सीचे प्रवक्ते इल्हाम वहाब यांनी सांगितलं की, कोल्ड लाव्हाच्या अचानक आलेल्या पुरामुळे 249 घरं उद्ध्वस्त झाली आहेत. 225 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. यामध्ये भातशेतीचाही समावेश आहे. बहुतांश रस्ते आणि पुलांचे नुकसान झाले आहे. आजूबाजूला फक्त चिखलच आहे. (फोटो: एपी)

मंगळवारपर्यंत 3396 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. लोकांना तंबू, अन्न, हायजिनिक किट, पोर्टेबल टॉयलेट, वॉटर प्युरिफायर देण्यात आले आहेत. रस्त्यावर अनेक फूट चिखल साचल्याने मदत साहित्य पोहोचण्यास विलंब होत आहे. कचरा साचला आहे. (फोटो: रॉयटर्स)

इंडोनेशियाच्या हवामान विभागाच्या प्रमुख द्विकोरिता कर्नावती यांनी सांगितलं की, या आठवड्यात पश्चिम सुमात्रामध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की लोकांना 17 ते 22 मे दरम्यान अतिवृष्टीनंतर अचानक पूर, भूस्खलन यासारख्या नैसर्गिक घटनांसाठी तयार राहावे लागेल. (फोटो: एपी)

लोकांना डोंगरापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे, कारण भूस्खलनाचा धोका जास्त आहे. रोझा योलांडा या स्थानिक रहिवासी म्हणाल्या की, पाऊस पडत आहे. अचानक दिवे गेले. घरात पाणी शिरले. यानंतर पूर आणि चिखलाने मी माझ्या घरापासून 200 मीटर दूर फेकली गेली. (फोटो: रॉयटर्स)

रोजाने सांगितलं की, भिंती आणि खिडक्यांना आदळल्यानंतर ती शेवटी एका ठिकाणी ड्रिफ्टवुडच्या ढिगाऱ्यात अडकली. तिच्या संपूर्ण शरीरावर ओरखडे आणि जखमा आहेत. वडील अद्याप बेपत्ता आहेत. बचाव कर्मचारी ट्रॅक्टर, जेसीबी आदींच्या साहाय्याने चिखल काढत आहेत. (फोटो: रॉयटर्स)

इंडोनेशियामध्ये एकूण 17 हजाराहून अधिक बेटे आहेत. लाखो लोक डोंगराखालील मैदानात राहतात. या घटनेच्या दोन महिन्यांपूर्वी पश्चिम सुमात्रामध्ये अचानक पूर आला होता. ज्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. 11 हून अधिक लोक बेपत्ता झाले होते. माउंट मेरापी ज्वालामुखीच्या उद्रेकाचा अंदाज नाही. (फोटो: रॉयटर्स)

माउंट मेरापी कधीही फुटू शकतो. तो सध्या खूप सक्रिय आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याने अनेक स्फोट घडवले. मात्र यावर्षी जानेवारीपासून तो पुन्हा सक्रिय झाला आहे. हा इंडोनेशियातील 120 सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे. (फोटो: रॉयटर्स)

इंडोनेशिया रिंग ऑफ फायर क्षेत्रात आहे. जिथे अनेक टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांना भेटतात. त्यामुळे या भागात अनेक भूकंप, त्सुनामी आणि ज्वालामुखीचा उद्रेक होत राहतात. जगातील बहुतेक ज्वालामुखी देखील येथे आहेत. (फोटो: रॉयटर्स)