CoronaVirus News : भय इथले संपत नाही! 'या' लोकांसाठी कोरोना ठरतोय 'काळ'; अमेरिकेत 8 लाख मृत्यू, परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 04:08 PM2021-12-16T16:08:15+5:302021-12-16T16:28:44+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉनने थैमान घातलेले असताना हा आकडा अत्यंत धडकी भरवणारा आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 27 कोटींच्या वर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक प्रगत देश हे कोरोना पुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभराचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत हा अत्यंत वेगाने पसरत आहे.

सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या ही अमेरिकेत आहे. तेथे आतापर्यंत तब्बल आठ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ओमायक्रॉनने थैमान घातलेले असताना हा आकडा अत्यंत धडकी भरवणारा आहे.

अमेरिकेमध्ये तब्बल 78 हजार नवे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. साधारण वर्षभरानंतर पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये कोरोना हा वृद्धांसाठी काळ ठरत असल्याचं समोर आलं आहे.

वृद्ध लोकांसाठी कोरोना अधिक खतरनाक आणि जीवघेणा आहे. आठ लाख कोरोना मृतांपैकी जवळपास 75 टक्के म्हणजेच सहा लाख लोक हे 65 वर्षांवरील आहेत. यातून कोरोना किती घातक असल्याचं स्पष्ट होत आहे.

अमेरिकेतील तब्बल 20 कोटींहून अधिक लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनमुळे कोरोनाच्या आणखी एका लाटेचा धोका असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर हा दिला जात आहे.

ओमायक्रॉनचे रुग्ण जगभरातील अनेक देशात आढळून आले असून जागतिक आरोग्य संघटनेच्या चिंतेत देखील भर पडली आहे. मास्क लावा, सोशल डिस्टंसिंगसह कोरोना नियमावलीचं पालन करा असं आवाहन करण्यात येत आहे.

कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटबाबत जास्तीत जास्त माहिती गोळा करण्यासाठी शास्त्रज्ञ अहोरात्र प्रयत्न करत आहेत. स्टडीद्वारे या व्हेरिएंटबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटवर आता हाँगकाँग युनिव्हर्सिटीची नवीन स्टडी आली आहे.

स्टडीमधील निष्कर्ष पाहता ओमायक्रॉनबाबत चिंता वाढवणारी आहेत. मात्र, या नवीन व्हेरिएंटमुळे लोक फारसे गंभीर आजारी पडत नाहीत, ही दिलासादायक बाब आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टरांकडून मिळालेल्या डेटावर केलेल्या स्टडीनुसार, ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा आणि मूळ कोरोना स्ट्रेनच्या तुलनेत जवळपास 70 पट वेगाने संक्रमित करतो. मात्र, गंभीर आजार खूपच कमी असण्याची शक्यता आहे.

संसर्गाच्या 24 तासांनंतर ओमायक्रॉन श्वसन प्रणालीमध्ये खूप वेगाने पसरतो, असे स्टडीत आढळून आले आहे. संशोधकांच्या टीमचे म्हणणे आहे की, आपल्या मूळ स्वरूपाच्या तुलनेत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन फुफ्फुसाच्या ऊतींमध्ये 10 पट कमी प्रतिकृती बनवतो, जो 'कमी तीव्र' असल्याचे दर्शवते.

स्टडीनुसार, ओमायक्रॉन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत वेगाने पसरतो. परंतु फुफ्फुसाच्या ऊतींना त्याच्या पूर्वीच्या व्हेरिएंटइतके नुकसान होत नाही. लस आणि पूर्वीच्या संसर्गापासून मिळालेल्या प्रतिकारशक्तीपासून सुद्धा ओमायक्रॉन संरक्षण करू शकतो. त्यामुळे तो धोकादायक असण्याचीही शक्यता आहे.

ओमायक्रॉनच्या सुरुवातीच्या डेटावरून असे दिसून आले आहे की, बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता नाही किंवा त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले जात नाही. काही लोकांमध्ये पुन्हा संसर्गाची प्रकरणे देखील आढळून येत आहेत, जी फार गंभीर नाहीत.

अनेक आरोग्य तज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटना लोकांना सावधगिरी बाळगण्याचा, गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा, योग्य प्रकारे मास्क लावण्याचा आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.