Corona Vaccination: क्या बात है! कोरोना लस घेतल्यावर लागणार 'लॉटरी'; मिळणार तब्बल ७ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 10:38 AM2021-05-28T10:38:26+5:302021-05-28T10:41:21+5:30

Corona Vaccination: कोरोना लसीकरणाला वेग देण्यासाठी लॉटरीचा आधार; दर आठवड्याला पाच विजेते जाहीर होणार

देशात आलेली कोरोनाची लाट ओसरू लागल्याचं दिसत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाखांहून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद व्हायची. आता हाच आकडा २ लाखांच्या खाली आला आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानं काहीसा दिलासा मिळाला असताना तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण अभियानाला वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कोरोना लसींच्या टंचाईमुळे अनेक राज्यांमध्ये लसीकरणाला ब्रेक लागत आहे.

कोरोना लसींबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. लसींच्या साईड इफेक्ट्सबद्दल शंकादेखील आहेत. लस घेतली तरी कोरोना होतोच, मग कशासाठी लस घ्यायची? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची संख्यादेखील खूप आहे.

कोरोना लसीकरण अभियान राबवण्यासाठी गेलेल्या पथकाला पाहताच ग्रामस्थांनी नदीत उडी घेतल्याची घटना नुकतीच उत्तर प्रदेशात घडली. त्यामुळे कोरोना लसीकरणाबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. त्यामुळेच अमेरिकेतील ओहियो राज्यात भन्नाट योजना सुरू करण्यात आली आहे.

लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी ओहियोमध्ये लॉटरी पद्धतीनं बक्षीसं दिली जाणार आहेत. राज्यपाल माइक डेविन यांनी याबद्दलची घोषणा केली. कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्ती लॉटरीमध्ये सहभाग घेऊ शकतात.

द गार्डियननं दिलेल्या वृत्तानुसार, लॉटरी जिंकणाऱ्या सगळ्यांना १० लाख डॉलर (७.३ कोटी रुपये) दिले जातील. पहिल्या आठवड्यातील लॉटरीसाठी २७ लाख लोकांनी अर्ज केला असल्याची माहिती डेविन यांनी दिली.

दर आठवड्याला पाच विजेत्यांची घोषणा केली जाईल. लॉटरीत सहभागी होणाऱ्यांसाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी एक गट, तर ते १२ ते १८ वर्षांदरम्यानच्या व्यक्तींसाठी दुसरा गट तयार करण्यात आला आहे.

१२ ते १८ वर्षांदरम्यानच्या व्यक्तींना बक्षिसात रोख रक्कम दिली जाणार नाही. त्यांना चार वर्षांची शिष्यवृत्ती दिली जाईल. त्यात ट्यूशन फीज आणि रुमच्या खर्चाचा समावेश असेल. यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.

लॉटरी योजनेवर होणारा खर्च ओहियो प्रशासन करेल. कोविडसाठी ठेवण्यात आलेल्या निधीतून हा खर्च केला जाईल. या संपूर्ण खर्चाचा हिशोबदेखील ठेवण्यात येईल.

ओहियो राज्यानं केलेल्या घोषणेची चर्चा सध्या संपूर्ण अमेरिकेत आहे. या योजनेमुळे लसीकरणात किती वाढ होते याकडे आता इतर राज्यांचं लक्ष लागलं आहे.