Corona Vaccine : कोरोना लस घ्या अन्यथा रुग्णालयात मिळणार नाही उपचार, सार्वजनिक सेवांपासूनही वंचित; 'या' देशाचा अजब निर्णय By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 09:34 AM 2021-07-19T09:34:36+5:30 2021-07-19T09:53:35+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: लसीकरणाबाबत एक कठोर निर्णय घेतला आहे. कोरोना लस न घेतलेल्या नागरिकांना रुग्णालयात उपचार नाकारण्यात येणार आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे.
जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 18 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण वेगाने सुरू असून लाखो लोकांनी लस घेतली आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी लोकांमध्ये लसीबाबत भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण असल्याने ते लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत.
काही देशांमध्ये लसीकरणाबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी कोरोना लस घेण्यास पुढाकार घ्यावा म्हणून त्यांना विविध ऑफर्स दिल्या जात आहेत.
चीनने लसीकरणाबाबत एक कठोर निर्णय घेतला आहे. कोरोना लस न घेतलेल्या नागरिकांना रुग्णालयात उपचार नाकारण्यात येणार आहे. चीनमधील काही राज्यांनी असा निर्णय जाहीर केला आहे.
चीन हा जगातील कदाचित पहिला देश आहे. ज्यामध्ये लोकांनी लस घेतली नाही तर त्यांना उपचारासारख्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात येणार आहे. चीनमध्ये मागील काही महिन्यांपासून कोरोना लसीकरणाला वेग देण्यात आला आहे.
चीनमधील कमीतकमी 12 राज्यांतील जवळपास 50 जिल्हा प्रशासनांनी लस न घेणाऱ्या नागरिकांना इशारा आहे. लस न घेतल्यास त्या नागरिकांना सार्वजनिक सेवांपासून वंचित ठेवले जाईल, असे आदेश काढले आहेत.
प्रशासनानकडून लस घेण्यासाठी या नागरिकांना जुलै अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. चीनमधील शिचुआन, फुजियान, शानक्सी, जिआंग्सू, जियांग्शी, गुआंग्शी, अनहुई, शेडोंग, हेबॅ, हेनान, झेजियांग आदी राज्यांमध्ये लस सक्तीची घोषणा करण्यात आली आहे.
काही राज्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या नागरिकांना सार्वजनिक परिवहन सेवा, सार्वजनिक स्थळी जाता येणार नाही. त्याशिवाय, ज्या मुलांच्या पालकांनी लस घेतली नाही, त्यांना शाळेत प्रवेश मनाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
काही राज्यांमध्ये कोरोना लस सक्तीबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची दखल चीनच्या आरोग्य आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या निर्देशाचे पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे.
चीनमधील आरोग्य विभागाच्या सुचनांनुसार, लस घेण्याच्या निकषात असलेल्या आणि लस घेण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने व अधिकाधिक करण्याची सूचना करण्यात आली आहे.
चीनने या वर्ष अखेरपर्यंत जवळपास 80 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य बाळगले आहे. त्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.
अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटीचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत आता पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. गेल्या 3 आठवड्यात रुग्णांचा आकडा दुप्पट झाला असून तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकेत पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या तीन आठवड्यात दुप्पट झाली आहे. ही आकडेवारी अमेरिकेसाठी धोक्याची घंटा असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.