Corona virus : धक्कादायक! 7 दिवसांत 36 लाख रुग्ण, 10000 जणांचा मृत्यू; चीनच नाही, संपूर्ण जगात कोरोनाचा पुन्हा हाहाकार By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 09:54 AM 2022-12-21T09:54:47+5:30 2022-12-21T10:10:18+5:30
चीन शिवाय अर्जेंटिना, ब्राझील आणि जपानमध्येही कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 7 दिवसांत जगभरात कोरोनाचे तब्बल 3632109 रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या जपानमध्ये 1055578 रुग्ण आढळून आले आहेत. केवळ चीनच नाही, तर जगातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा मान वर काढली आहे. जगभरात गेल्या एका आठवड्यात कोरोनाचे तब्बल 36 लाख रुग्ण आढळून आले आहेत. एवढेच नाही तर, या 7 दिवसांत 10 हजार लोकांचा मृत्यूही झाला आहे.
चीन शिवाय अर्जेंटिना, ब्राझील आणि जपानमध्येही कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. जगभरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेत भारत सरकारनेही यासंदर्भात आढावा बैठक बोलावली आहे.
एका आठवड्यात जगभरात 36 लाख रुग्ण - गेल्या 7 दिवसांत जगभरात कोरोनाचे तब्बल 3632109 रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या जपानमध्ये 1055578 रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय, दक्षिण कोरियात 460766, फ्रान्समध्ये 384184, ब्राझीलमध्ये 284,200, अमेरिकेत 272,075, जर्मनीमध्ये 223,227, हाँगकाँगमध्ये 108577 तसेच, चीनचा शेजारी असलेल्या तैवानमध्ये 107381 रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या 7 दिवसांत 10 हजार जणांचा मृत्यू - गेल्या 7 दिवसांत जपानमध्ये कोरोनामुळे 1670 जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत 1607 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, दक्षिण कोरियामध्ये 335, फ्रान्समध्ये 747, ब्राझीलमध्ये 973, जर्मनीमध्ये 868, हाँगकाँगमध्ये 226, तैवानमध्ये 203, इटलीमध्ये 397 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
गेल्या 24 तासांत किती रुग्ण आढळले? - गेल्या 24 तासांत अमेरिकेत 22578 रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय, जपानमध्ये 72297, जर्मनीत 55016, ब्राझीलमध्ये 29579, दक्षिण कोरियात 26622, फ्रान्समध्ये 8213, तैवानमध्ये 10359 तर रशियात 6341 रुग्ण आढळून आले आहेत.
तर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसंदर्भात बोलायचे झाल्यास, अमेरिकेत गेल्या 24 तासांत 140, फ्रान्समध्ये 178, जर्मनीत 161, ब्राझीलमध्ये 140, जापानमध्ये 180 लोकांना कोरोना व्हायरसमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार - चीनचा विचार करता, चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. तेथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. चीनमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. चीनने पुन्हा एकदा कोरोनाची आकडेवारी लपविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडिओंमधून चीनमध्ये कोरोनाने रुद्र रूप झारण केल्याचे दिसत आहे.
चीनमध्ये रुग्णसंख्या एवढी झपाट्याने वाढत आहे, की आता तेथील रुग्णालयांमध्ये बेडटा तुटवडाही जाणवू लागला आहे. रुग्णांवर जमिनीवर उपचार केले जात आहेत. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफच्या कमतरतेबरोबरच औषधांचाही तुटवडा जाणवू लागला आहे. ताप आणि डोकेदुखीसाठी आवश्यक असलेली अनेक औषधे चीनमध्ये आउट ऑफ स्टॉक झाली आहेत.
चीनमध्ये रोजच्या रोज शेकडो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. म्हत्वाचे म्हणजे, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वेटिंग सुरू असल्याचा दावाही केला जात आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, चीनमध्ये 2023 मध्ये कोरोना स्फोट होऊ शकतो आणि येथे लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा दावाही तज्ज्ञांनी केला आहे.
भारत सरकार अलर्ट मोडवर...! संपूर्ण जग भरात कोरोना व्हायरस पुन्हा एकदा वेगाने पसरत असताना, आता भारत सरकारही सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना अलर्ट केले आहे. सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नवीन कोविड-पॉझिटिव्ह रूग्णांचे नमुने INSACOG (Indian SARS-CoV-2 Genomics Consortium) प्रयोगशाळेत पाठविण्यास सांगितले आहे. यामुळे, या सॅम्पल्सची जीनोम सिक्वेंसिंग होऊ शकेल आणि जर कोरोनाचा नवीन व्हेरिअंट आढळलाच तर तो ट्रॅक केला जाऊ शकेल.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे की, या संपूर्ण प्रयत्नांमुळे देशात एखादा नवा व्हेरिअंट असेल, तर त्याची वेळेत माहिती मिळेल. याआधारे केंद्र सरकार आवश्यक सार्वजनिक आरोग्य सुविधा पुरवेल. महत्वाचे म्हणजे, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि INSACOG देशातील कोरोनाच्या ट्रेंडवर लक्ष ठेवून आहेत.