CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! तुमच्या लॅबमधून लीक झाला व्हायरस?; WHO च्या रिपोर्टला चीनने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 11:59 AM2022-06-11T11:59:35+5:302022-06-11T12:26:18+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: चीनमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं जातं. मात्र आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 53 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. अनेक देशामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. चीनमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं जातं. मात्र आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टला चीनने उत्तर दिलं आहे.

चीनने शुक्रवारी वुहान शहरातील प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरसची सुरुवात झाल्याचं म्हटल्याच्या दाव्यावर जोरदार निशाणा साधला असून, हा आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) रिपोर्टनंतर चीनने हे विधान केलं आहे, ज्यामध्ये प्रयोगशाळेतून व्हायरस लीक होण्यासाठी जबाबदार धरण्याआधी अधिक सखोल तपास करणे आवश्यक आहे असं म्हटलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनीही चीन तपासकर्त्यांना पूर्ण सहकार्य करत नसल्याचा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले की चीन विज्ञान-आधारित तपासणीचे स्वागत करतो, परंतु राजकीय हेराफेरी नाकारतो.

जेव्हा कोरोना व्हायरसचा प्रसार सुरू झाला आणि त्याने जगभर हाहाकार माजवला, तेव्हा सर्वांच्या नजरा चीनकडे लागल्या होत्या. चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या देशांमध्ये जास्त आणि चीनमध्ये कमी दिसला.

नोव्हेंबर 2019 मध्ये चीनमध्ये कोरोना व्हायरसची सुरुवात झाली. सुमारे अडीच वर्षांनंतरही चीनमध्ये केवळ 2 लाख, 26 हजार 580 बाधित आढळले आहेत आणि 5 हजार, 226 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगातील इतर देशांमध्ये या महामारीमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

चीनमधून सुरू झालेल्या या व्हायरसमुळे चीन ज्या प्रकारे मोठा संसर्गापासून स्वत:चा बचाव करत होता, त्याबद्दल सर्वांच्या मनात चीनच्या हेतूबद्दल शंका आहे. या संशयाच्या आधारे जागतिक आरोग्य संघटनेकडे (WHO) याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

कोरोना व्हायरसमुळे पसरलेल्या कोविड-19 साथीचे मूळ शोधण्यासाठी WHO ने एक विशेष गट तयार केला आहे. आता या विशिष्ट गटाचे म्हणणे आहे की या संदर्भात अधिक अभ्यासाची गरज आहे. चीनच्या प्रयोगशाळेतून व्हायरस लीक झाल्याचा अधिक अभ्यास करायला हवा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. अनेक प्रगत देशही त्याच्यापुढे हतबल झाले आहेत. सर्वच देशात लसीकरण मोहीम सुरू असून कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.