Corona Virus: कोरोना नेमका आला कुठून? समितीनं अहवाल दिला, केली महत्वाची सूचना...! By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 08:33 AM 2022-06-13T08:33:44+5:30 2022-06-13T08:37:22+5:30
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून जगाला वेठीस धरलेल्या कोरोना नामक विषाणूच्या उगमाचा मागोवा जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) घेत आहे. त्यासाठी काही तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या समितीने अहवाल तयार केला असून त्याआधारे भविष्यात कोरोनासदृश महासाथ पसरली तर कशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापन करता येईल, हे ठरवले जाणार आहे.
डब्ल्यूएचओचा पुढाकार जागतिक आरोग्य संघटनेद्वारा नियुक्त तज्ज्ञांच्या समितीने कोरोना विषाणूच्या उगमाचा अभ्यास केला. जगभरातील २६ तज्ज्ञांचा समावेश असलेल्या या समितीचे नाव सायंटिफिक ॲडव्हायजरी ग्रुप फॉर ओरिजिन्स ऑफ नोव्हेल पॅथोजेन्स (सॅगो) असे आहे.
या समितीने कोरोनासंदर्भातील डब्ल्यूएचओचा चीनवरील अहवाल आणि अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेचा अहवाल यांचा अभ्यास केला. या दोन्ही अहावालांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वटवाघळांपासून झाल्याचे नमूद होते.
वटवाघळांबाबत काय म्हणणे? कोरोना विषाणूच्या उगमबाबतच्या नव्या अहवालात हा विषाणू पक्ष्यांपासून पसरला असण्याची शक्यता दाट आहे, असे नमूद आहे.
कोरोनाचा विषाणू सर्वप्रथम आढळला चीनच्या वुहान शहरात. तथापि, मूळ कोणापासून हा विषाणू पसरला याची स्पष्टता अहवालात नाही.
उद्देश काय? कोरोनासारखी महासाथ भविष्यात आली तर त्यास तोंड कसे द्यायचे याची नियमावली तयार करणे हा मुख्य उद्देश आहे.
उगम का नाही उमगला? या प्रश्नाचे उत्तर मुख्यत: चीनकडून पुरेशा प्रमाणात न मिळालेला डेटा, असे आहे. चिनी शास्त्रज्ञांनी ४० हजार लोकांचे नमुने डब्ल्यूएचओकडे पाठवले. मात्र, त्यातून ठोस माहिती हाती लागू शकली नाही.
या सर्व गोंधळामुळे कोरोना विषाणूचा उगम नेमका कुठे झाला, याचे निश्चित उत्तर मिळू शकले नाही. कोरोनावरील सर्व देशांचा डेटा, अभ्यास अहवाल, निष्कर्ष यांचा अभ्यास समितीतर्फे सुरू आहे.