Corona Virus : कोरोनाचा धसका! चीनमध्ये रुग्ण वाढले; जगातील सर्वात मोठं इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, 24 मेट्रो स्टेशन्स बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 12:26 PM2022-08-31T12:26:16+5:302022-08-31T12:44:31+5:30

Corona Virus : कोरोनाची भीती आणि केसेस वाढण्याची भीती एवढी आहे की चीनमध्ये जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ बंद करावी लागली आहे. एवढेच नाही तर येथील 24 मेट्रो स्टेशन्सही बंद करण्यात आली आहेत.

चीनच्या वुहान शहरातून उगम पावलेल्या कोरोना व्हायरसने गेल्या अडीच वर्षांत जगभर हाहाकार माजवला आहे. या व्हायरसने जगभरात लाखो लोकांचा बळी घेतला आहे आणि लाखो लोकांना संसर्ग झाला आहे. आजही लाखो लोक कोरोनाच्या संसर्गाशी झुंज देत आहेत. याच दरम्यान, चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग खूपच कमी झाला आणि मृतांची संख्याही खूप कमी नोंदवली गेली. पण याता पुन्हा चिंता वाढवली आहे.

चीनने परत एकदा संपूर्ण देशाचं टेन्शन वाढवलं आहे. पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाची भीती आणि केसेस वाढण्याची भीती एवढी आहे की चीनमध्ये जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ बंद करावी लागली आहे. एवढेच नाही तर येथील 24 मेट्रो स्टेशन्सही बंद करण्यात आली आहेत.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, चीनच्या दक्षिणेकडील शेनझेन शहरातील हुआकियांगबेई येथील जगातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट कोरोनाच्या भीतीमुळे तात्पुरते बंद करण्यात आले आहे. येथे असलेल्या 3 मोठ्या इमारतींना 2 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इमारतींमध्ये मायक्रोचिप आणि फोनचे सुटे भाग विकणारी हजारो दुकाने आहेत. लोकांना घरून काम करायला सांगण्यात आलं असून अनेक ऑफिसने वर्क फ्रॉम होम दिलं आहे. शहरातील 24 मेट्रो स्टेशन पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 28 ऑगस्ट रोजी शेनझेनमध्ये 11 लोक कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले आणि या कोरोना संसर्गाचा आणखी वेगाने प्रसार रोखण्यासाठी ही खबरदारीची पावले उचलण्यात आली आहेत. शेनझेनची लोकसंख्या तब्बल 1.8 कोटी आहे.

फ्युटियान आणि लुओहू जिल्ह्यात कोरोनाची प्रकरणे अचानक वाढली असून यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. येथील सर्व सिनेमा हॉल, बार-रेस्टॉरंट आणि उद्याने 2 सप्टेंबरपर्यंत बंद करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 60 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 607,364,838 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 6,492,406 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 583,378,154 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. अनेक देशात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे.