ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 05:47 PM2020-07-08T17:47:03+5:302020-07-08T17:51:44+5:30

कोरोनाचा उद्रेक हा चीनच्या वुहान शहरात झाला होता. तेथून हा व्हायरस भारतासह अमेरिका, युरोपमध्ये पसरला. यानंतर या व्हायरसने अवघी दुनियाच कवेत घेतली आहे. यामुळे जगाला लॉकडाऊन करावे लागले आहे.

विस्तारवादी भूमिकेमुळे चोहोबाजुंनी घेरल्या गेलेल्या चीनने आता जगाला मोठी धमकी दिली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समध्ये ही धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

कोरोनाचा उद्रेक हा चीनच्या वुहान शहरात झाला होता. तेथून हा व्हायरस भारतासह अमेरिका, युरोपमध्ये पसरला. यानंतर या व्हायरसने अवघी दुनियाच कवेत घेतली आहे. यामुळे जगाला लॉकडाऊन करावे लागले आहे.

लॉकडाऊन झाल्याने जगाची अर्थव्यवस्थाच बुडीत निघाली असून कोट्यवधी लोकांचे रोजगार बुडाले आहेत. बलाढ्य अमेरिकेसह अनेक देशांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

कोरोनामुळे 1.19 कोटीच्या आसपास लोक संक्रमित झाले असून 5.47 लाख लोक बळी पडले आहेत. यापैकी चीनचा आकडा तीन ते चार हजारच आहे. या साऱ्या प्रकारामुळे चीनविरोधात अवघे जग एकवटले आहे.

भारतीय सीमेवर घुसखोरी केल्याने गेल्या महिन्यात गलवान घाटीमध्ये हिंसक घटना घडली होती. चीनच्या सैन्याने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचे बरेच सैनिक मारले गेले होते. यामुळे चीन सीमेवर युद्धजन्य़ परिस्थिती होती. तर तैवानलाही चीन धमक्या देत होता.

चीनच्या या आक्रमकपणामुळे अमेरिकेने चीनच्या समुद्रात मोठमोठ्या युद्धनौका पाठवून युद्धाभ्यास सुरु केला आहे. यामुळे चीन खवळला असून त्याने जगालाच मोठी धमकी देऊन टाकली आहे.

अमेरिका जगातील मोठ्या देशांना चीनविरोधात उकसावत आहे. तो चीनविरोधात या देशांना आपल्या बाजुने करत आहे. याचा गंभीर परिणाम होणार असल्याचे ग्लोबल टाईम्सने संपादकीय मध्ये म्हटले आहे.

अमेरिका आपला प्रभाव वाढवू लागला आहे. जगाला याचे परिणाम भोगावे लागतील. चीनसोबत क्षेत्रिय वाद असलेल्या सर्व देशांना अमेरिका पाठिंबा देत आहे. याचबरोबर अमेरिका पश्चिमी आणि आशियाई देशांनाही चीनविरोधात भडकवित आहे.

चीनचा व्यापार अमेरिकेएवढाच आहे. जवळपास 100 देशांशी चीनचे व्यापारी संबंध आहेत. या संबंधांना अमेरिका खराब करू पाहत आहे. याची किंमत जगाला खूप काळ भोगावी लागणार आहे.

सध्या कोरोनाची जगात सुरु असलेली लाट ही पहिलीच आहे. जगाला आता खूप काळ नुकसान झेलावे लागणार आहे. महामारी वाढूनही अमेरिकेने आंतरराष्ट्रीय सहकार्याला रोखले आहे, असे ग्लोबल टाईम्समध्ये म्हटले आहे.

आता असे वाटत आहे की, जमिनीवरून सुरु झालेला संघर्ष पुन्हा मूळ स्थितीवर येणार नाही. अमेरिका चीनविरोधात मोठी चाल खेळत आहे. यामुळे पुढील काळात तिरस्कार वाढणार आहे. यामुळे युद्धाचा धोका उत्पन्न होण्याची शक्यता आहे. यातून अनेक देशांना नुकसान होईल.