coronavirus: वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 01:19 PM 2020-08-06T13:19:16+5:30 2020-08-06T13:36:57+5:30
कोरोना विषाणू आणि त्याच्या संसर्गामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू होऊन आता आठ महिन्यांचा काळ लोटत आला आहे. दरम्यानच्या काळात कोरोना विषाणू आणि त्याच्या संसर्गामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोनाच्या फैलावास जिथून सुरुवात झाली. त्या चीनमधील वुहानमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची फुप्फुसे खराब झाल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्याबरोबरच आधी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपैकी ५ टक्के रुग्ण पुन्हा संसर्ग होऊन रुग्णालयात भरती झाले आहेत.
वुहान युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांनी केलेल्या सर्वेमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. हॉस्पिटल्स इंटेंटिव्ह केअर युनिट्सचे संचालक पेंग झियोंग यांच्या नेतृत्वाखाली वुहान विद्यापीठाच्या झॉन्गनँग रुग्णालयात एक पथक कार्यरत आहे. यामध्ये वुहानमधील कोरोनामुक्त झालेल्या १०० रुग्णांचा एक सर्व्हे करण्यात आला.
हे पथक कोरोनामुक्त झालेल्या १०० रुग्णांवर एप्रिल महिन्यापासून लक्ष ठेवून होते. तसेच वेळोवेळी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत होते. दरम्यान, एक वर्ष चालणाऱ्या या सर्वेचा पहिला टप्पा जुलै महिन्यात संपला. या सर्वेमध्ये समावेश केलेल्या रुग्णांचे सरासरी वय ५९ वर्षए एवढे आहे.
दरम्यान, या सर्व्हेच्या पहिल्या टप्प्यातील निष्कर्षांमध्ये कोरोनामुक्त झालेल्या ९० टक्के रुग्णांची फुप्फुसे पूर्णपणे बिघडण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून आले. म्हणजेच या रुग्णांच्या फुप्फुसांचे व्हेंटिलेशन आणि गॅस एक्सचेंट फंक्शन योग्य पद्धतीने काम करत नसल्याचे समोर आले आहे. हे रुग्ण कोरोनामुक्त झाले असले तरी अद्याप पूर्णपणे ठीक झालेले नाहीत.
पेंग यांच्या पथकाने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसोबत सहा मिनिटांची वॉक टेस्ट केली. त्यामध्ये हे रुग्ण सहा मिनिटांमध्ये केवळ ४०० मीटरच चालू शकत असल्याचे दिसून आले. सर्वसाधारणपणे सुदृढ व्यक्ती सहा मिनिटांमध्ये ५०० मीटर अंतर कापू शकते.
कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना तीन महिन्यांनंतरही ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करावा लागत आहे. एवढेच नाही तर १०० पैकी १० रुग्णांमधील कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटिबॉडीदेखील संपुष्टात आल्या आहेत.
पाच टक्के रुग्ण कोविड-१९ न्यूक्लिक टेस्टमध्ये निगेटिव्ह दिसत आहेत. तर इम्युनोग्लोब्युलिन एम टेस्टमध्ये पॉझिटिव्ह दिसत आहेत. म्हणजेच अशा रुग्णांना पुन्हा एकदा क्वारेंटिन व्हावे लागणार आहे.
मात्र या व्यक्तींना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला आहे की, जुना आजार त्यांना पुन्हा पुन्हा बाधित करत आहे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, कोरोनातून सावरलेल्या रुग्णांच्या शरीरातील विषाणूविरोधात लढणाऱ्या टी सेलच्या संख्येमध्येही मोठी घट झाल्याचे दिसून आले.
पेंग यांनी सांगितले की, कोरोना संसर्गातून मुक्त झालेले रुग्ण आतापर्यंत पूर्णपणे बरे झालेले नाहीत. त्यांना पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी अजून काही काळ लागू शकतो.