CoronaVirus : धोका वाढला! चीनमध्ये कोरोनाची 'दुसरी' लाट; बीजिंगमध्ये लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 14:18 IST2020-06-13T14:02:44+5:302020-06-13T14:18:54+5:30
राजधानी बीजिंगमध्ये सहा कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर अनेक बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत.

चीनमध्ये कोरोना व्हायरस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राजधानी बीजिंगमध्ये सहा कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर अनेक बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत.
या नवीन प्रकरणांमुळे बीजिंगमध्ये गेल्या तीन दिवसांत संक्रमित लोकांची संख्या वाढून नऊवर पोहोचली आहे. तर चीनच्या इतर भागात संक्रमितांची संख्या 12वर गेली आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) शनिवारी सांगितले की, शुक्रवारी देशात कोरोना विषाणूच्या एकूण 18 नवीन रुग्णांची खात्री पटली असून, यामध्ये बीजिंगमधील स्थानिक संसर्गाच्या 6 घटनांचा समावेश आहे.
शुक्रवारपर्यंत ७ नवीन रुग्ण समोर आल्यानं आता अशा रुग्णांची एकूण संख्या 98 झाली आहे. बीजिंगमधील अधिका-यांच्या मते, शिनाफादी बाजारात मासे स्वच्छ करणाऱ्या बोर्डावर हा कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे.
कोरोना विषाणूमुळे पुन्हा चिंता वाढली
शिनफादी बाजाराचे प्रमुख झांग यूक्सी यांनी शुक्रवारी बीजिंग न्यूजला सांगितले की, संपर्कात आलेल्या नऊ जणांना वेगवेगळं ठेवण्यात आलं आहे. तपासणीत त्यांना संसर्ग झाल्याचे आढळले नाही.
सुमारे दोन महिन्यांपासून शहरात कोरोनाचे कोणतेही नवीन रुग्ण आढळले नसल्यामुळे बीजिंगमधील संक्रमणाच्या घटनांमध्ये होणारी वाढ अधिकाऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे.
शहरातील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव काई की यांनी सांगितले की, विषाणूचा पुन्हा प्रसार होण्याची शक्यता कमी करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना 'युद्धपातळीवर' तयार राहण्यास सांगितले गेले आहे. ‘ग्लोबल टाईम्स’ या अधिकृत वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, चीनच्या आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे अशा घटना समोर येणं ही सामान्य बाब आहे.
कारण हा संसर्गजन्य रोगाचे समूळ निर्मूलन झालेलं नाही. दोन कोटी लोकसंख्या असणा-या या शहरातील रहिवाशांनी आधीच खबरदारी घेण्यास सुरुवात केल्यानं घाबरून जाण्याचं कारण नाही.
शिनफादी बाजार आणि जिंगशान सीफूड बाजार त्वरित केले बंद
शुक्रवारी सापडलेले दोन रुग्ण बीजिंगमधील फेंगटाई जिल्ह्यातील मांस संशोधन केंद्रातील आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लियू या आडनावाचा एक रुग्ण पूर्वेकडील चीनच्या शांगडोंग प्रांतात पाच दिवसांचा प्रवास करून आला होता, तर दुसर्याने अलीकडच्या काळात कोणताही प्रवास केला नव्हता.
बीजिंगने फेंगटाई जिल्ह्यातील शिनफादी बाजार आणि जिन्शेन सीफूड बाजार ताबडतोब बंद केले आहेत, जिथे संक्रमित रुग्ण गेला होता.
. एकूणच बीजिंगमधील सहा घाऊक बाजारांनी शुक्रवारी आपली कामे पूर्णपणे किंवा अंशतः बंद केली आहेत. बीजिंग शहरात सलग दुस-या दिवशी कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर शुक्रवारी शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही बदलण्यात आला.