coronavirus: कोरोनावरील लसीसाठी चीन इरेला पेटला, वरिष्ठ अधिकाऱ्यालाच औषधाच्या चाचणीचा डोस दिला By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 04:16 PM 2020-07-29T16:16:08+5:30 2020-07-29T16:24:13+5:30
सर्वात आधी आपल्याकडे लस तयार व्हावी म्हणून अनेक देश प्रयत्नशील आहेत. दरम्यान, अमेरिका, ब्रिटन आणि चीन या देशांमध्ये कोरोनाच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. कोरोनावरील लस लवकरात लवकर विकसित करण्यासाठी सध्या जगातील अनेक देशांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. सर्वात आधी आपल्याकडे लस तयार व्हावी म्हणून अनेक देश प्रयत्नशील आहेत. दरम्यान, अमेरिका, ब्रिटन आणि चीन या देशांमध्ये कोरोनाच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.
दरम्यान, सर्वात आधी आपल्या देशात कोरोनावरील लस विकसित व्हावी यासाठी जंगजंग पछाडत असलेल्या चीनने चक्क आपल्या देशातील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (सीडीएस) च्या प्रमुखांवरच कोरोनावरील या लसीचा प्रयोग केला आहे.
एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार चिनमधील सीडीएसचे प्रमुख गाओ फू यांनी स्वत:च याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्याला कोरोनावर विकसित करण्यात येत असलेल्या लसीचे इंजेक्शन देण्यात आल्याचे सांगितले. तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पू्र्ण होण्यापूर्वी कोरोनावरील लस ही प्रभावी असल्याचा दावा कुणीही करू शकत नाही. दरम्यान, चाचणीमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांसाठी ही लस धोकादायकसुद्धा ठरू शकते असा दावा, काही तज्ज्ञांनी केला आहे.
अनेक देशांमध्ये कोरोनावरील लसीच्या चाचणीत सहभागी होण्यासाठी लोकांनी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन केले जाते. मात्र चीनमध्ये काही सरकारी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लसीच्या परीक्षणाचे इंजेक्शन टोचून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, चीनच्या सीडीएसचे प्रमुख गाओ फू यांनी स्वत:सुद्धा लस टोचून घेतल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये कोरोनावरील लसीच्याविरोधात काही लोकांकडून मोहीम चालवण्यात येत आहे. मात्र अशा लोकांमुळे इम्युनिटी मिळवण्यामध्ये अडथळे येऊ शकतात, असा दावा कोरोनावरील तज्ज्ञ अँथनी फाऊसी यांनी केला आहे.
मात्र आपल्याला कधी आणि कुठे लस देण्यात आली याची माहिती गाओ फू यांनी दिलेली नाही. सध्या कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी चीन अमेरिका आणि ब्रिटन यांच्यात तगडी स्पर्धा सुरू आहे. यामध्ये ज्या देशाला यश मिळेल तो देश त्याला जगात मोठी आघाडी मिळू शकते.
सद्यस्थितीत जगभरात सुमारे २४ लसींवर काम सुरू असून, त्यापैकी आठ लसी ह्या चीनमध्ये विकसित होत आहेत. दरम्यान यापैकी कुठली लस घेतली याचा खुलासा गाओ फू यांनी केलेला नाही.