coronavirus: कोरोना फैलावला, बेरोजगारी वाढली, संतापलेल्या नागरिकांनी पंतप्रधानांच्या घराची वाट बंद केली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 02:21 PM2020-07-25T14:21:20+5:302020-07-25T14:34:43+5:30

इस्राइलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढू लागल्याने तसेच बेरोजगारी वाढल्याने संतापलेल्या तरुणांनी आंदोलन करून पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरची वाट बंद केली आहे.

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, इस्राइलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढू लागल्याने तसेच बेरोजगारी वाढल्याने संतापलेल्या तरुणांनी आंदोलन करून पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरची वाट बंद केली आहे.

इस्राइलमध्ये आतापर्यंत ५९ हजार ४७५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, आतापर्यंत ४४८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने संतप्त झालेल्या तरुणांनी गेल्या तीन दिवसांपासून पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, इस्राइलमध्ये दहा लाख लोक बेरोजगार झाले आहेत.

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा योग्य पद्धतीने सामना करता आला नाही, असा आंदोलकांचा आरोप आहे. तसेच त्यांनी नेतान्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, आंदोलकांनी नेतान्याहू यांच्या घराकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत.

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार या आंदोलनामध्ये खूप कमी वयाचे युवा नागरिक सहभागी झाले आहेत. या तरुणांना ११ वर्षांपूर्वी मताधिकार नव्हता. दरम्यान, नेतान्याहू हे ११ वर्षांपुर्वीच इस्राइलचे पंतप्रधान बनले होते.

माजी सैनिक असलेल्या २५ वर्षीय मायान श्रेम यांने याबाबत सांगितले की, आम्ही देशासाठी लढणे बंद करणार नाही. तर २६ वर्षांचा त्यांचा मित्र ओरेन यांने सांगितले की, बदलांची सुरुवात ही मुळापासूनच होते.

सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरल्याने पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे कौतुक केले होते. रुग्णांची संख्या घटल्याने अनेक रुग्णालये बंद करावी लागली होती. मात्र मे महिन्यामध्ये नेतान्याहू यांनी कोरोनावर विजय मिळवल्याची घोषणा इस्त्राइलच्या जनतेसमोर केली. तसेच सावधगिरी बाळगून घराबाहेर पडण्याचा सल्ला जनतेला दिला.

मात्र नेतान्याहू यांनी लोकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन केल्यानंतर काही दिवसांतच परिस्थिती बिघडली. आता देशात दररोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दोन हजारापर्यंत पोहोचली आहे. तसेच देशात सुमारे १० लाख लोक बेरोजगार झाले आहेत.