coronavirus: कोरोना गेला, लॉकडाऊन हटले; पर्यटकांच्या स्वागतासाठी हे १० सुंदर देश सज्ज झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 00:02 IST2020-06-09T23:49:27+5:302020-06-10T00:02:06+5:30
कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे विमान आणि पर्यटन उद्योगाला जबर धक्का बसला आहे. मात्र काही देशातील परिस्थिती आता नियंत्रणात आल्याने पर्यटकांसाठी पर्यटनाची कवाडेही आता उघडू लागली आहेत.

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या संपूर्ण जगावर बिकट परिस्थिती ओढावली आहे. सध्या काही ठिकाणी कोरोनाचा प्रकोप सुरू असला तरी काही देशांमध्ये आता परिस्थिती सुधरू लागली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे विमान आणि पर्यटन उद्योगाला जबर धक्का बसला आहे. मात्र काही देशातील परिस्थिती आता नियंत्रणात आल्याने पर्यटकांसाठी पर्यटनाची कवाडेही आता उघडू लागली आहेत. अशाच जगातील सुंदर अशा दहा देशांनी आता पर्यटन उद्योग सुरू करण्याचा दिशेने पावले टाकली आहेत. त्या देशांचा घेतलेला हा आढावा.
क्रोएशिया
क्रोएशिया - युरोपमधील या छोट्याशा पण सुंदर देशाने बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठीचे लॉकडाऊनचे निर्बंध आता हटवले आहेत. तसेच १ जूनपासून युरोपियन युनियनमधील पर्यटकांसाठी देशाच्या सीमा खुल्या केल्या आहेत.
सायप्रस
सायप्रस - सायप्रस हा देशसुद्धा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. मात्र सध्यातरी काही मोजक्याच देशांमधील लोकांना सायप्रसला जाता येणार आहे. मात्र पुढच्या काळात अजून काही देशातील लोकांना सायप्रसमध्ये फिरण्याची संधी मिळेल.
जर्मनी
जर्मनी - जर्मनीमध्येसुद्धा आता कोरोना जवळपास नियंत्रणात आला आहे. जर्मन सरकारनेसुद्धा १५ जूनपासून आंतरराष्ट्रीय पर्यटन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या केवळ ३१ देशातील नागरिकांना जर्मनीमध्ये प्रवेश मिळेल.
फ्रान्स
फ्रान्स - कोरोनाच्या प्रकोपातून सावरल्यानंतर आता फ्रान्सही पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. देशात १५ जूनपासून आंतरराष्ट्रीय पर्यटन सेवा सुरू होईल, असे फ्रान्सच्या पंतप्रधानांनी सांगितले. मात्र सुरुवातीच्या काळाता फ्रान्समध्ये केवळ युरोपियन देशातील नागरिकांनाच प्रवेश मिळेल.
ग्रीस
ग्रीस - ग्रीस हा पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध देश आहे. ग्रीस सरकार १५ जूनपासून आपल्या देशात पर्यटन सुरू करत आहे. सध्या येथे केवळ २९ देशातील पर्यटकांना प्रवेश मिळेल. उर्वरित देशांमधून येणाऱ्या नागरिकांना मात्र पहिले दोन आठवडे क्वारेंटिन राहावे लागेल.
आइसलँड
आइसलँड - आईसलँडच्या पंतप्रधानांनीसुद्धा १५ जूनपासून देशातील पर्यटन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांना प्रथम विमानतळावर वैद्यकीय तपासणी करावी लागेल. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना फिरण्याची परवानगी दिली जाईल. मात्र पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास आयसोलेशनमध्ये राहावे लागेल.
इटली
इटली - एकवेळ जगातील कोरानाचा हॉटस्पॉट बनलेल्या इटलीमधील परिस्थितीसुद्धा आता नियंत्रणात आलेली आहे. देशातील पर्यटनसेवा ३ जूनपासून सुरू झाली आहे तसेच युरोपियन युनियमधील देशातील पर्यटकांनीसुद्धा इटलीमध्ये ये जा सुरू केली आहे.
जमैका
जमैका - कॅरेबियन बेटांवरील जमैका हा देश सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथेसुद्धा १५ जूनपासून पर्यटनाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे जमैक सध्या जगातील कुठल्याही देशातील पर्यटकांचे स्वागत करण्यास सज्ज आहे.
मेक्सिको
मेक्सिको - मेक्सिकोनेसुद्धा ८ जूनपासून आपली सीमा पर्यटनासाठी उघडली आहे. मात्र सध्या देशातील काही ठिकाणी जाण्यावर पर्यटकांना निर्बंध घालण्यात आले आहेत.
सेंट लुशिया
सेंट लुशिया - सेंट लुशियाने ४ जूनपासून पर्यटनाला सुरुवात केली आहे. मात्र येथे आलेल्या पर्यटकांना विमानतळावर उतरल्यानंतर ४८ तासांच्या आत कोविड-१९ निगेटिव्हचा रिपोर्ट दाखवावा लागतो. तेव्हाच या पर्यटकांना देशात फिरण्याची परवानगी मिळते.