Coronavirus:...तर कोरोना युद्धात अमेरिकेला धोका वाढणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ निर्णय महागात पडणार! By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 02:31 PM 2020-05-30T14:31:30+5:30 2020-05-30T14:34:32+5:30
डब्ल्यूएचओपासून दूर जाण्याच्या निर्णयावर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाच्या कडक टीका होत आहे. संसर्गजन्य रोग आणि लहान मुलांच्या डॉक्टरांच्या संघटनेने ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध सुरू केला आहे. ट्रम्प यांचा निर्णय कोरोनाच्या लढाईत आणखी अडचणी निर्माण करणारा आहे.
अमेरिकन एकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने म्हटले आहे की, असा निर्णय घेणे मुलांच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरेल. महामारीच्या या टप्प्यात डब्ल्यूएचओपासून दूर जाण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनेक निरपराध मुलांचे जीवन धोक्यात येऊ शकते.
अमेरिकन एकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क डेल मोंटे म्हणाले की, डब्ल्यूएचओशी संबंध संपवल्यास देशात पोलिओचा धोका वाढू शकतो. याशिवाय मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही वाढ होऊ शकते. तसेच जीव वाचवणारी लस तयार करण्यास अधिक वेळ लागेल.
डब्ल्यूएचओचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे कोविड -१९ च्या विरोधातील जागतिक तयारीवरच परिणाम होणार नाही तर आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मुलांच्या वाढत्या आरोग्यावर विपरित परिणाम होईल. संस्थेने ट्रम्प प्रशासनाला डब्ल्यूएचओ बरोबर काम करत राहण्याचे आणि जागतिक स्तरावर मुलांच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.
डब्ल्यूएचओला अमेरिकेतून सर्वाधिक निधी मिळतो. गेल्या काही दशकांमध्ये, आरोग्य संस्थेला दरवर्षी अमेरिकेकडून ८०० कोटी (१०७ यूएस मिलियन डॉलर्स ते ११९ यूएस मिलियन डॉलर्स) पेक्षा जास्त आर्थिक मदत दिली जात आहे.
गेल्या महिन्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओला आर्थिक मदत बंद करण्याचा इशारा दिला होता. शुक्रवारी अमेरिकेने संयुक्त राष्ट्र संघाच्या आरोग्य विभाग डब्ल्यूएचओकडून पारंपारिक नेतृत्व भूमिका रद्द केली.
अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष पॅट्रिस हॅरिस म्हणाले की, ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाला कोणताही तर्क नाही. अशा तर्कविहीन कृतीचे परिणाम भयंकर असू शकतात. विशेषत: अशा वेळी जेव्हा डब्ल्यूएचओच्या नेतृत्वात कोरोना विषाणूच्या लसीखाली मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू आहेत.
कोरोना विषाणूने कोणत्याही सीमेचा विचार न करता संपूर्ण अमेरिकेवर परिणाम झाला आहे. त्याचा पराभव करण्यासाठी संपूर्ण जगाने एकत्र येणे आवश्यक आहे. अमेरिकन मेडिकल असोसिएशनने कोरोना विषाणूबरोबरच्या युद्धादरम्यान आपलं नेतृत्व सोडण्याचा त्याग करु नये असं आवाहन केलं आहे.
अमेरिकन रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राचे माजी डॉक्टर डॉ. थॉमस फ्रेडन म्हणाले की, डब्ल्यूएचओ तयार करण्यात आमचे मोठे योगदान आहे. आम्ही त्याचा एक भाग आहोत आणि डब्ल्यूएचओला पाठ दाखवून जाण्याने जगाला कमकुवत आणि असुरक्षित वाटू लागेल.
फ्रीडेन यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आता चीनसह जगातील इतर अनेक देशांकडे अमेरिका वगळता डब्ल्यूएचओची वीटो शक्ती असेल. असं केल्यानं अमेरिका अधिक असुरक्षित होईल.