coronavirus: लहान मुलांवर कसा होतो कोरोनाचा परिणाम, समोर आली मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 06:55 PM2020-06-27T18:55:54+5:302020-06-27T19:05:40+5:30

अध्ययनानुसार फारच कमी मुलांना कोरोनाच्या गंभीर संसर्गाचा सामना करावा लागतो, असे समोर आले आहे.

कोरोना विषाणूच्या वेगाने होत असलेल्या फैलावामुळे सध्या जगात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. दरम्यान, कोरोनाचा धोका हा मोठ्या व्यक्तींना अधिक असला तरी लहान मुलांमध्ये कोरोनामुळे गंभीर स्थिती फारशी निर्माण होत नसल्याचे तज्ज्ञांचे मत होते.

आता नव्या संशोधनामधूनही त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या अध्ययनानुसार फारच कमी मुलांना कोरोनाच्या गंभीर संसर्गाचा सामना करावा लागतो, असे समोर आले आहे.

तसेच कुठल्याही मुलामध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे दिसली आणि त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करावे लागले तरीही अशा मुलांचा मृ्त्यू होण्याची शक्यता कमीच असते. मात्र कोरोनाचा संसर्ग झालेल्या मुलांमध्ये कोणत्या प्रकारचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.

याबाबतची माहिती thelancet.com मध्ये प्रकाशित झाली आहे. संशोधकांनी युरोपमधील २० देशांमधील लहान आणि किशोरवयीन मुलांचा अभ्यास करून ही माहिती मिळवली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण ५८२ मुलांचा अभ्यास करून ही माहिती संकलीत करण्यात आली.

कोरोनाचा संसर्ग झाला तरी बहुतांश मुलांमध्ये सौम्य लक्षणेच दिसतात, असे या संशोधनातून समोर आले आहे. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाणही एक टक्क्याहून कमी दिसून आले आहे.

केवळ नवजात अर्भक आणि आधीपासूनच कुठल्याही आजाराचा सामना करत असलेल्या मुलांनाच आयसीयूमध्ये दाखल करण्याची गरज भासते, असेही अभ्यासातून समोर आले आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग होणाऱ्या मुलांमध्ये कुठलीही लक्षणे दिसत नाहीत, असेही समोर आले आहे.