Coronavirus In China : चीनमध्ये कोरोनाचा कहर, आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 10:32 AM2022-12-22T10:32:20+5:302022-12-22T10:42:19+5:30

२४ तास सामूहिक अंत्यसंस्कार सुरू

चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरू असताना या विषाणूचा बीएफ.७ (बीए ५.२.१.७) हा नवा अवतार सापडला आहे. तज्ज्ञांच्या मते तो ओमिक्रॉनचे सर्वात धोकादायक उत्परिवर्तन असून एक रुग्ण १८ जणांना संसर्ग करीत आहे. दरम्यान,चीनमध्ये आता सामूहिक अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली असून आरोग्य सेवा कोलमडल्यामुळे रुग्णांना उपचार मिळणेही अवघड झाले आहे.

चीनमध्ये काही महिन्यात ८० कोटी लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते, शून्य कोविड धोरण संपल्यानंतर सुमारे २० लाख मृत्यू होऊ शकतात, असा दावा एअरफिनिटी या लंडनस्थित जागतिक आरोग्य विश्लेषण कंपनीने केला आहे. या उद्रेकासाठी कमी लसीकरण आणि प्रतिकारशक्तीचा अभाव ही कारणे कंपनीने दिली आहेत.

चीनमधील संसर्गाची परिस्थिती २०२० ची आठवण करून देणारी आहे. रुग्णालयातील सर्व खाटा भरल्या आहेत. औषधी दुकानांतील औषधे ही संपत आली आहेत. उपचारासाठी रुग्ण डॉक्टरांसमोर भीक मागताना दिसतात. मुलांना ताप आल्यावर माता बटाटे घालून ताप उतरवण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होत असल्याने चीनच्या रुग्णालयांमधील काही अस्वस्थ करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ‘द टेलिग्राफ’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक डॉक्टर एकामागून येणाऱ्या रुग्णांना तपासताना खुर्चीतच ग्लानी येऊन घसरून खाली पडतात.

त्यानंतर अन्य डॉक्टर तातडीने धाव घेत त्यांना खुर्चीवरून हटवतात. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रचंड थकवा आणि कामाचा ताण यामुळे रुग्णाला तपासतानाच डॉक्टर झोपल्याचा अंदाज वर्तविला जात आहे

तर, दुसऱ्या व्हिडीओमध्ये अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण हॉस्पिटलमध्ये खाली जमिनीवरच पडलेले दिसत असून, तिथेच त्यांना सीपीआर देत असल्याचे दिसते. नेटकऱ्यांमध्ये या व्हिडीओंमुळे खळबळ उडाली असली तरी चीनकडून मात्र अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

जगभरात एका आठवड्यात कोरोनाचे ३४ लाख ८४ हजार रुग्ण आढळले आहेत. त्यातील ९ हजार ९२८ लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये ७ दिवसांत १५ हजार ५४८ रुग्ण आणि ७ मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र,खरा आकडा लपवला जात असल्याचा संशय आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि फ्रान्समध्ये एका आठवड्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

स्मशानभूमीत २४ तास अंत्यसंस्कार केले जात असून सामूहिक अंत्यसंस्कार सुरू झाले आहेत. मात्र,कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची अधिकृत आकडेवारी दररोज केवळ ५ ते १० सांगितली जात आहे. खरा आकडा कितीतरी जास्त असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे.