CoronaVirus Live Updates : अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा विस्फोट! 3 आठवड्यात रुग्णांचा आकडा दुप्पट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 11:00 AM2021-07-15T11:00:33+5:302021-07-15T11:16:56+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असं असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे.

कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 18 कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 189,178,283 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 4,074,555 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.

अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटीचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत आता पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. गेल्या 3 आठवड्यात रुग्णांचा आकडा दुप्पट झाला असून तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे.

अमेरिकेत पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या तीन आठवड्यात दुप्पट झाली आहे. ही आकडेवारी अमेरिकेसाठी धोक्याची घंटा असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

अमेरिकेत गेल्या काही महिन्यांपासून कोरोनारुग्णांचा आलेख खाली जात होता. परंतु गेल्या काही आठवड्यांत बदल होऊ लागला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून, कोरोनाची अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.

तीन आठवड्यांपूर्वी, एका दिवसात आढळलेल्या रुग्णांचा आकडा आता दुप्पट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 23 जून रोजी अमेरिकेत कोरोनाचे 11 हजार 300 प्रकरणे नोंदवण्यात आली. तर सोमवारी 23 हजार 600 नवे रुग्ण आढळले आहेत.

अमेरिकेत आतापर्यंत 55.6 टक्के लोकसंख्येचं कोरोना लसीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्याची परिस्थिती फार चिंताजनक नसल्याचा देखील दावा केला जात आहे.

अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सध्या 260 च्या आसपास कोरोना मृत्यूची नोंद केली जात आहे. कोरोना लसीकरणामुळे गंभीर आजारी होण्याचे आणि मृतांचे प्रमाण कमी झाले असल्याचं म्हटलं जात आहे.

नेब्रास्का मेडिकल सेंटर विद्यापीठाचे ग्लोबल सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटीमधील डॉक्टर जेम्स लॉलर यांनी लोकांना मास्कचा वापर करण्याचं आवाहन केलं. लोकांनी मास्कचा वापर आवर्जून करण्याची आवश्यकता असून गर्दीची ठिकाणे टाळली पाहिजे. अन्यथा परिस्थिती आणखी वाईट होऊ शकतं असं म्हटलं आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण केल्यानंतरही ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोके वर काढलं आहे.

कोरोनाविरोधातील लस घेतलेल्या प्रौढांमध्येही कोरोनाच्या संसर्गाचे रुग्ण खूप वेगाने वाढत आहेत. (Coronavirus In Britain) ब्रिटनमधील किंग्स कॉलेज लंडनचे वरिष्ठ व्हायरस ट्रॅकिंग स्पेशालिस्ट प्रा. टीम स्पेक्टर यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.

एकूण 87 टक्के बाधित लोक ते आहेत ज्यांनी कोरोनाची लस घेतलेली आहे. अशा परिस्थितीत आता 19 जुलैपासून ब्रिटनमध्ये पूर्णपणे अनलॉक करणे योग्य ठरणार का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

ब्रिटनमध्ये 6 जुलै रोजी कोरोनाच्या 12 हजार 905 अशा रुग्णांचे निदान झाले होते ज्यांनी कोरोनावरील लस घेतलेली होती. त्यामुळे 6 जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण हे लसीकरण झालेल्या लोकांमधून सापडले. प्राध्यापक स्पेक्टर यांच्या अंदाजानुसार येत्या काळात हा आलेख अधिकच वर जाण्याची शक्यता आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूच्या संबंधीचे सर्व निर्बंध 19 जुलै रोजी संपुष्टात येणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. जॉन्सन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, निर्बंध हटवल्यानंतर ब्रिटनमध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे आता आवश्यक नसेल.