CoronaVirus Live Updates : कोरोना रिटर्न्स! चीनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'या' ठिकाणी शटडाऊन, लाखो लोकांवर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 04:29 PM2022-07-27T16:29:48+5:302022-07-27T16:52:23+5:30

CoronaVirus Live Updates : चीनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. दहा लाख लोकसंख्या असलेल्या जियांगक्सियामध्ये शटडाऊन लागू करण्यात आला आहे.

जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 57 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 577,453,330 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 6,407,920 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरात वेगाने लसीकरण सुरू असून संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

चीनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. दहा लाख लोकसंख्या असलेल्या जियांगक्सियामध्ये शटडाऊन लागू करण्यात आला आहे. चीनच्या वुहानमध्ये सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण आढळला होता.

सिनेमा हॉल, बार आणि कॅफे बंद करण्यात आले आहेत. जियांगक्सियामध्ये कोरोनाचे चार नवे रुग्ण आढळले आहेत. यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जियांगक्सियाच्या शहरी परिसरात हे लागू करण्यात आले आहे.

प्रशासनाने कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहून बार, सिनेमा आणि कॅफे बंद केले आहेत. याशिवाय मार्केट, रेस्टॉरंटदेखील बंद आहेत. मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन देखील सध्या रोखण्यात आलं आहे.

सर्व धार्मिळ स्थळं देखील बंद करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्था बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. बससह सर्व पब्लिक ट्रान्सपोर्टदेखील बंद असून लोकांना शहर न सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी 4 हायरिस्कवाले परिसर शोधले असून तेथीस लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. चीनच्या वुहानमध्ये 2020 च्या सुरुवातीला जगातला पहिला लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

जगभरात लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोना विषाणूच्या स्रोताबाबत मोठा खुलासा झाला आहे. दोन निरनिराळे कोरोना विषाणू चीनच्या वुहानच्या बाजारातून जिवंत विकल्या जाणाऱ्या पशूंद्वारे पसरत होते, असं मत संशोधकांनी एका नव्या संशोधनादरम्यान व्यक्त केलं आहे.

सीएनएनच्या अहवालानुसार, दोन नवीन संशोधनांमध्ये पूर्णपणे भिन्न दृष्टीकोन स्वीकारण्यात आला होता. परंतु दोन्ही एकाच निष्कर्षावर आले. हा निष्कर्ष चीनच्या वुहान शहरातील हुआनान सीफूड मार्केटचा होता. हेच मार्केट कोरोना विषाणूचं केंद्रस्थान होतं अशी सर्वाधिक शक्यता यातून व्यक्त करण्यात आली.

हे संशोधन सायन्स जर्नलमध्ये मंगळवारी प्रकाशित झाले आहे. एका संशोधनात जगभरातील शास्त्रज्ञांनी मॅपिंग टूल्स आणि सोशल मीडिया रिपोर्ट्सचा वापर केला. त्यांना आढळले की नेमकी परिस्थिती निश्चित करणे खूप कठीण असले तरी वुहान मार्केटमध्ये जिवंत विकल्या गेलेल्या प्राण्यांमध्ये हा विषाणू उपस्थित होता.