कोरोनाचा प्रकोप! रुग्णसंख्येमुळे 'या' ठिकाणी रुग्णालयातील जागा अपुरी; रस्त्यावर सुरू आहेत उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 09:44 AM2022-02-20T09:44:09+5:302022-02-20T09:54:07+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसच्या सर्वात वाईट टप्प्याचा सामना करत आहे. येथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहेत.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 42 कोटींचा टप्पा पार केला असूण एकूण संख्या 423,809,825 वर पोहोचली आहे. तर 5,901,261 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील विविध रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू आहेत. अनेकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. 348,805,392 जण कोरोनातून बरे झाले आहेत.

हाँगकाँगमध्ये कोरोना प्रकोप पाहायला मिळत आहे. हाँगकाँग कोरोना व्हायरसच्या सर्वात वाईट टप्प्याचा सामना करत आहे. येथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत.

कोविड-१९ च्या चाचणीसाठी लोकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. चीनप्रमाणे येथेही शून्य-कोविड धोरण अवलंबले गेले. मात्र असे असूनही लोकांना अशा भीषण संकटातून जावे लागत आहे.

कोरोनाचा संसर्ग पसरण्यापासून रोखता यावे यासाठी येथील विविध भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे.

हाँगकाँगमध्ये लूनर न्यू ईयरच्या च्या सुट्ट्या असल्याने, कोरोना व्हायरसच्या दैनंदिन प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून हे घडत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

हाँगकाँगमधील रुग्णालये 90 टक्के क्षमतेने कार्यरत आहेत आणि काही रुग्णालये इतकी भरलेली आहेत की त्यांना बाहेरील खुल्या जागेत, रस्त्यांवर रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करावी लागते.

कोविड-19 च्या तपासणीसाठी लोकांची संख्याही वाढली आहे. त्यासाठीच मनोरंजन उद्यानासारख्या ठिकाणी तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हायरस पसरण्याच्या भीतीने रेस्टॉरंट्स देखील रिकामी आहेत आणि लोक त्यांच्या घरात बंद आहेत.

चीनमधील शहरांनी हाँगकाँगच्या लोकांना प्रवेश नाकारला आहे. ते म्हणतात की त्यांना क्वारंटाईन ठेवणं दूर, त्यांना देशात प्रवेश दिला जाणार नाही. संसर्ग पसरण्याच्या भीतीने हे करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमागे ओमायक्रॉन प्रकार जबाबदार असल्याचे मानले जाते. या महिन्यात दैनंदिन संसर्गाच्या प्रकरणांमध्ये 60 पट वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे सरकारला आपल्या कोविड धोरणांमध्ये सुधारणा करावी लागली.

ओमायक्रॉनची लक्षणे सामान्य सर्दी आणि फ्लू सारखीच असतात, त्यामुळे संसर्गाचे निदान करणे कधीकधी कठीण असते, ज्यामुळे उपचारास विलंब होतो. सामान्य लक्षणे वाढत आहेत. यामुळे सतर्क असणं गरजेचं आहे.

हाँगकाँगमध्ये सुरुवातीपासूनच कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे येथे संसर्गाची एकूण 40 हजार प्रकरणे नोंदली गेली असून 259 लोकांचा मृत्यू झाला आहे.

जे इतर जगाच्या तुलनेत खूपच कमी आहे. 57 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या सिंगापूरमध्ये पाच लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत आणि जवळपास 900 लोकांचा मृत्यू झाला आहे.

शून्य कोविड धोरणांतर्गत हाँगकाँगमधील सीमा पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या आणि कोरोना विषाणूची लक्षणे नसलेल्या रुग्णांनाही येथे ठेवण्यात आले होते. याठिकाणी संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना वेगळे करणेही आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.