CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग सुस्साट! हाँगकाँगमध्ये पाचवी लाट; ओमायक्रॉन घालतोय थैमान, परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 04:21 PM2022-03-03T16:21:22+5:302022-03-03T16:54:52+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: सध्या हाँगकाँगची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 44 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 440,648,082 वर पोहोचली आहे. तर 5,993,066 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा वेग सध्या मंदावत असला तरी काही ठिकाणी मात्र अद्यापही भीषण परिस्थिती आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून मृतांचा आकडा देखील वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या वाढत्या आकड्याने त्यांचं टेन्शन वाढलं आहे. याच दरम्यान हाँगकाँगमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला असून पाचवी लाट आली आल्याचं पाहायला मिळत आहे.

कोरोनाचा वेग सुस्साट आहे. पण यासोबतच ओमायक्रॉन थैमान घातल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत हाँगकाँगमध्ये 55 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत.

मार्चच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात टेस्टिंग केलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये कोरोनाची पाचवी लाट पीकवर असेल. त्यानंतर रुग्णसंख्या ही हळूहळू कमी होईल.

सध्या हाँगकाँगची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत आहे. अनेक ठिकाणी आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले आहेत.

आरोग्य व्यवस्थेवर जास्त ताण येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोना लसीकरणाचा वेग मंदावणं हे गंभीर परिस्थिती निर्माण होण्यामागचं मोठं कारण आहे. हाँगकाँगमधल्या अनेक लोकांनी अद्याप लस घेतलेली नाही.

कोरोना मृतांपैकी अनेकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. एका आठवड्यात हाँगकाँगमध्ये 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. येणाऱ्या दिवसात ही परिस्थिती आणखी बिघडू शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोना व्हायरस नियंत्रणात आल्याने 2021 मध्ये अनेकांनी लसीकरण केले नाही. हाँगकाँगची लोकसंख्या सुमारे 74 लाख आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मृत्यूचा हा ट्रेंड असाच सुरू राहिला तर मे महिन्याच्या मध्यापर्यंत एकूण मृतांची संख्या 3,206 वर पोहोचेल.

हाँगकाँगमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. हाँगकाँग कोरोना व्हायरसच्या सर्वात वाईट टप्प्याचा सामना करत आहे. येथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत.

रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येने रेकॉर्ड केला आहे. रुग्णालयं आणि शवागृहात मृतदेह ठेवण्यास जागा कमी पडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल असं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

हाँगकाँग पब्लिक डॉक्टर्स असोसिएशनचे प्रमुख टोनी लिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, डझनभर मृतदेह शहरातील रुग्णालयांमध्ये शवगृहात नेण्याची वाट पाहत आहेत. रुग्णालयातील अनेक मृतदेह लॉबीमध्ये पडलेले आहेत तर शवागृह पूर्णपणे भरलेली आहेत.

रूग्णालयात कर्मचार्‍यांचा तुटवडा जाणवत आहे. मृतदेह नेण्यासाठी अधिक वेळ लागेल असल्याने सरकारसुद्धा हतबल असल्याचं दिसत आहे. हाँगकाँगमध्ये मोठ्या संख्येने वृद्ध लोक आहेत. या वृद्धांचं लसीकरण केले गेले नाही. दुष्परिणामांमुळे अनेकांनी कोरोना लस घेतली नाही.

कोविड-१९ च्या चाचणीसाठी लोकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. चीनप्रमाणे येथेही शून्य-कोविड धोरण अवलंबले गेले. मात्र असे असूनही लोकांना अशा भीषण संकटातून जावे लागत आहे.

हाँगकाँगमध्ये लूनर न्यू ईयरच्या च्या सुट्ट्या असल्याने, कोरोना व्हायरसच्या दैनंदिन प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून हे घडत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

हाँगकाँगमधील रुग्णालये 90 टक्के क्षमतेने कार्यरत आहेत आणि काही रुग्णालये इतकी भरलेली आहेत की त्यांना बाहेरील खुल्या जागेत, रस्त्यांवर रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करावी लागते.