CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग! इटलीत एका दिवसात तब्बल 1 लाख रुग्ण; युरोपमध्ये परिस्थिती गंभीर By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 06:44 PM 2022-07-06T18:44:22+5:30 2022-07-06T19:04:25+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाने आतापर्यंत 6,364,785 लोकांचा बळी घेतला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 556,566,861 वर पोहोचली आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 55 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही ठिकाणी भीषण परिस्थिती आहे. प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले असून प्रशासनाची चिंता वाढली आहे.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोनाने आतापर्यंत 6,364,785 लोकांचा बळी घेतला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 556,566,861 वर पोहोचली आहे. दुसरीकडे 530,929,512 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
जगात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. युरोपीय देशात नव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. इटलीमध्ये एका दिवसात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण आहे.
कोरोनाचा धडकी भरवणारा वेग समोर आला असून इटलीमध्ये गेल्या 24 तासांत एक लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहे. नव्या रुग्णांचा संख्या 132274 होती तर 94 जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आठ फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा 100000 हून अधिक रुग्ण आढळले होते. तर इटली हा जगातील आठवा देश आहे जिथे कोरोनामुळे सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत.
जगभरात सध्या कोरोनाचे दोन कोटींहून अधिक एक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचं पुन्हा एकदा म्युटेशन झालं असून आता आणखी एक नवीन सब व्हेरिएंट समोर आला आहे.
एका संशोधकाने ट्विटरवर दावा केला आहे की, भारतात ओमायक्रॉनचा नवा सब व्हेरिएंट BA.2.75 सापडला आहे. तसेच याचे रुग्ण हे भारताव्यतिरिक्त इतरही सात देशांत आढळल्याचं देखील म्हटलं आहे.
ओमायक्रॉन हा आतापर्यंतचा सर्वात संक्रमक व्हेरिएंट आहे. बाकी व्हेरिएंटच्या तुलनेत तो थोडा कमी गंभीर मानला जातो. तो जास्त संक्रमक असण्यामागचं कारण म्हणजे त्याचं सातत्याने म्युटेशन होत आहे.
ओमायक्रॉनचे सब व्हेरिएंट सतत समोर येत आहे. जगभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. तसेच अनेक ठिकाणी अद्यापही नियमावलीचं पालन करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.