CoronaVirus Live Updates : संकटं संपता संपेना! कोरोनाचा वेग मंदावतोय पण 'या' देशांनी वाढवलं टेन्शन; परिस्थिती अत्यंत वाईट By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 07:37 PM 2022-03-09T19:37:32+5:30 2022-03-09T19:51:12+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 450,273,398 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 6,038,413 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोना व्हायरसपुढे हतबल झाले आहेत. काही ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र अद्यापही धोका कायम आहे.
कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 45 कोटींचा टप्पा पार केला आहे.कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 450,273,398 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 6,038,413 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 384,542,829 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या कोरोनाचा वेग मंदावताना पण असं असताना काही मात्र देशांनी टेन्शन वाढवलं आहे. तेथील परिस्थिती अत्यंत वाईट असून कोरोना रुग्णांच्या, मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या साप्ताहिक रिपोर्टनुसार, 28 फेब्रुवारी ते 6 मार्च 2022 दरम्यान कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत पाच टक्क्यांची तर मृतांच्या आकड्यात आठ टक्क्यांची घट पाहायला मिळत आहे.
रिपोर्टनुसार, पॅसिफिकच्या पश्चिम भागात कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. एका आठवड्यात नव्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. तब्बल 46 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मंगोलिया, चीन, ऑस्ट्रेलिया, कम्बोडिया, फिज़ी, जपान, मलेशिया, लाओस, फिलिपीन्स, न्यूझीलँड, सोलोमन द्वीप, सिंगापूर, दक्षिण कोरिया, पलाऊ, व्हिएतनाम, पापुआ न्यू गिनीसारख्या देशांचा समावेश आहे.
अमेरिकेत या आठवड्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. 10579 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये 3865 आणि जपानमध्ये 1519 जणांनी जीव गमावला आहे. तर इंडोनेशियामध्ये मृतांच्या संख्येत 23 टक्क्यांची वाढ झाली आहे.
4 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान गोळ्या करण्यात आलेल्या 99.7 टक्के सँपलमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट सापडला आहे. ओमायक्रॉन हा अत्यंत वेगाने पसरत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चीनच्या वुहानमधून कोरोनाचा वेगाने प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे.
चीनने जगाचं टेन्शन वाढवलं असून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. चिनी मीडियानुसार, महामारीच्या सुरुवातीस वुहानमध्ये उद्रेक झाल्यानंतर आता देशात एकाच दिवसात सर्वाधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत.
चीनने म्हटलं आहे की इतकी प्रकरणे म्हणजे कोविड शून्य धोरणाला मोठा धक्का आहे. त्याचबरोबर चीनमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर इतर देशही सतर्क झाले असून त्यांनी नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी चीनमधील एका शहरात कोरोनाचे फक्त तीन रुग्ण आढळले म्हणून जवळपास 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या तिन्ही रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं पाहायला मिळाली नाही.
चीनच्या यूझूमध्ये पूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. शहरातील सर्व नागरिकांना कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी घराबाहेर न पडण्याची सूचना करण्यात आली होती. या शहराची लोकसंख्या 10 लाखांहून अधिक आहे.