CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग! दीड महिन्यांत तिप्पट झाली रुग्णांची संख्या; WHOचा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 12:39 PM2022-07-22T12:39:57+5:302022-07-22T13:04:04+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा भयावह वेग पाहायला मिळत आहे. युरोपमध्ये गेल्या सहा आठवड्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण तीन पटीने वाढल्याचं समोर आलं आहे.

जगभरात कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 57 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 572,836,962 वर पोहोचली आहे. तर 6,398,503 जणांचा मृत्यू झाला आहे.

लाखो लोकांनी कोरोनावर मात केली असून 542,838,500 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामन करत असून अनेक ठिकाणी अत्यंत गंभीर परिस्थिती पाहायला मिळत आहे.

कोरोनाचा भयावह वेग पाहायला मिळत आहे. युरोपमध्ये गेल्या सहा आठवड्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण तीन पटीने वाढल्याचं समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 19 जुलै रोजी ही आकडेवारी जाहीर केली आहे.

कोरोना संसर्गाचे हे प्रमाण जगभरातील कोरोना संसर्गाच्या 50 टक्के आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील दुप्पट झाली आहे. दरम्यान, दिलायादाक बाब म्हणजे अतिदक्षता विभाग (ICU) भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) युरोपचे संचालक डॉ. हंस क्लूज (Dr. Hans Kluge) यांनी युरोपमधील वाढत्या कोरोना संसर्गावर चिंता व्यक्त केली आहे. डॉ. हंस क्लूज यांनी म्हटलं आहे की, कोरोना भयानक घातक आजार आहे.

या आजाराकडे दुर्लक्ष न करण्याचं आवाहन केलं आहे. युरोपमध्ये गेल्या दीड महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण तीन पटीने वाढलं आहे. युरोपातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे आरोग्य व्यवस्थेच्या चिंतेत भर पडली आहे.

WHO युरोपचे संचालक डॉ. हंस क्लुज यांनी युरोपमधील लोकांना कोरोनाबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. लोकांनी कोरोना आजाराकडे दुर्लक्ष न करता याला गांभीर्याने घेण्याचं आवाहन केलं आहे.

डॉ. क्लुज म्हणाले की, ओमायक्रॉनच्या सब-व्हेरिएंटमुळे कोरोनाची नवी लाट आली आहे. अशाप्रकारे, वारंवार होणारे संक्रमण दीर्घकाळ कोरोनाचं कारण बनू शकते. वाढत्या रुग्ण संख्येमुळे रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे.

रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्तता आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे आव्हान असेल. या आठवड्याच्या सुरुवातीला, दोन ब्रिटीश मेडिकल जर्नलच्या संपादकांनी सांगितलं की, कधीच देशाची राष्ट्रीय आरोग्य सेवा इतकी कमजोर पडली नव्हती, जितकी कोरोना महामारीमुळे पडली आहे.

बीएमजेचे कामरान अब्बासी आणि हेल्थ सर्व्हिस जर्नलचे अॅलिस्टर मॅकलेलन यांनी संयुक्त संपादकीयमध्ये लिहिले आहे की, यूके सरकार कोविड-19 च्या बिघडलेल्या परिस्थितीमुळे निर्माण होत असलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, नवीन रुग्णांसाठी रुग्णालयांबाहेरच्या रुग्णवाहिकांच्या रांगाही अपुर्‍या पडत आहेत. लसीकरणामुळे रूग्णालयात दाखल होण्यासाठी कमी रुग्ण असल्याचा सरकारचा दावाही वृत्तपत्रांनी ठामपणे फेटाळून लावला.

लसीमुळे या गंभीर आजारात आणि मृतांच्या संख्येत घट झाल्याचे त्यांनी मान्य केलं आहे. युरोपमध्ये कोरोचा विस्फोट झाला असून लोकांचं टेन्शन वाढलं आहे. भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.