Coronavirus: लॉकडाऊनचे नियम मोडल्यास 'या' देशांमध्ये मोठी शिक्षा; घराबाहेर पडल्यास झाडणार गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 03:30 PM2020-04-05T15:30:00+5:302020-04-05T15:47:47+5:30

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. घराबाहेर न पडण्याच्या नागरिकांना वारंवार सूचना करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं असल्याचं सरकारनं अधोरेखित केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात जवळपास ९० देशांमध्ये लॉकडाऊन आहे. संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार जगभरात १८० देशांमध्ये शाळा-कॉलेज बंद करण्यात आले आहेत. जगभरातल्या देशात लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यास वेगवेगळे कायदे आहेत. सौदी अरेबियात कोरोनाचा संसर्ग झाल्याचं लपवल्यास १ कोटी रुपयांचा दंड आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका हा इटलीला बसला आहे. इटलीत कोरोनाच्या संसर्गामुळे १५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत कामाशिवाय घराबाहेर पडल्यास २.५ लाख रुपयांचा दंड ठोठावला जातोय. आतापर्यंत या कायद्यांतर्गत ४० हजारांहून अधिक लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.

हाँगकाँगमध्ये क्वारंटाइनचे नियम मोडल्यास २.५ लाखांचा दंड आणि ६ वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.

सौदी अरेबियातही कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती लपवणे आणि प्रवासाचा इतिहास न सांगितल्यास १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला जातोय. जो इतर देशांच्या तुलनेत मोठा आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये लॉकडाऊनचे नियम मोडल्यास २३ लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.

रशियामध्ये क्वारंटाइनचे नियम तोडल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

मॅक्सिकोत या आजाराची माहिती लपवल्यास ३ वर्षं जेलची हवा खावी लागू शकते.

राष्ट्रपती रोडिगो दुतेर्ते यांच्या आदेशानुसार क्वारंटाइन नियमाचं उल्लंघन केल्यास गोळी घालण्यास सांगण्यात आलं आहे.

दक्षिण आफ्रिकेत जर विनाकारण घराबाहेर पडलात तर पोलीस रबराच्या गोळ्या तुमच्यावर झाडणार आहे.

पेरूमध्येही सरकारनं कोरोनासाठी हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. परंतु जर कोरोना हेल्पलाइनवर खोटी माहिती दिल्यास ४५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

पनामामध्ये महिला-पुरुष एकाच दिवशी घराबाहेर पडू शकत नाहीत. एक दिवस महिलेनं, तर दुसऱ्या दिवशी पुरुषानं घराबाहेर पडण्याचा तिथे कायदा आहे. जसे की, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी फक्त दोन तासांसाठी महिला घराबाहेर पडू शकतात.