CoronaVirus News : बिल गेट्स यांचा धक्कादायक खुलासा; 2016मध्येच ट्रम्प यांना दिला होता महामारीचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 11:58 PM 2020-05-12T23:58:56+5:30 2020-05-13T00:14:40+5:30
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. दोन-पाच देश सोडले, तर बहुतांश देश कोरोना संकटाचा कंबर कसून सामना करत आहेत. अशातच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या बिल गेट्स यांनी मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. गेट्स यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये, 2016मध्येच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना महामारी येणार असल्याचा इशारा दिला होता, असे म्हटले आहे.
बिल गेट्स यांनी वॉल स्ट्रिट जर्नलला सोमवारी एक इंटरव्ह्यू दिला. यात ते म्हणाले, "मी योरोपात, अमेरिकेत जगभरातील लोकांना भेटलो." एवढेच नाही, तर 2016मध्ये ट्रम्प टॉवरमध्ये राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनाही ते भेटले होते. यावेळी त्यांनी भविष्यातल्या महामारीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली होती. ते म्हणाले, की त्यांनी हा मुद्दा अधिक जोर लाऊन उचलायला हवा होता.
गेट्स म्हणाले, 'हे फार भयानक वाटते. यासंदर्भात मी म्हणू शकतो, की आपण वेळेत कारवाई केली असती, तर नुकसान कमी करता आले असते.'
'जर मी लोकांचे लक्ष या धोक्याकडे आकर्षित करण्यासाठी त्याच वेळी, अधिक जोर लावून हा मुद्दा उचलला असता तर आज, अशी परिस्थिती आली नसती,' अशी खंतही गेट्स यांनी या इंटरव्ह्यूमध्ये व्यक्त केली.
इंटरव्ह्यूदरम्यान बिल गेट्स यांनी सांगितले, की जागतीक स्तरावर अनेक नेते सैद्धांतिक दृष्ट्या आपल्याशी सहमत होते. काहींनी तर याची तयारी करण्यसाठी पावलेही उचलायला सुरूवात केली होती. काही देशांनी आपल्या बळावरच तयारीलाही सुरुवात केली होती.
गेट्स म्हणाले, "मी जेव्हा, श्वसनासंबंधित व्हायरसच्या बाबतीत विचारले, तुम्ही ट्रांसमिशन कितपत कमी करू शकता? मास्कची खरोखरच मदत होते का?" या प्रकारच्या प्रश्नांचे सरकारकडे कुठलेही ठोस उत्तर नव्हते.
यापूर्वीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये बिल गेट्स यांनी सांगितले होते, की ते कोरोना व्हायरसवरील 7 व्हॅक्सीन तयार करत असलेल्या कंपन्यांना निधी पुरवत आहोत. या सातही वॅक्सीन एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्याचे काम सुरू आहे.