CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 07:10 PM2020-06-16T19:10:02+5:302020-06-16T19:24:59+5:30

एका ताज्या अभ्यासानंतर, तज्ज्ञांनी निष्कर्ष काढला आहे, की जगातील 170 कोटी लोक, म्हणजेच एकूण जगातील लोकसंख्येच्या 20 टक्क्यांहून अधिक लोक कोरोनाने गंभीररित्या संक्रमित होऊ शकतात. कारण, बरेच लोक आधीपासूनच लठ्ठपणा आणि हृदयविकाराच्या समस्यांचा सामना करत आहेत.

एएफपीच्या अहवालानुसार लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनने जागतिक आकडेवारीचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे. मधुमेह, फुफ्फुसाचा त्रास, एचआयव्ही यांसारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांच्या डेटाचा तज्ज्ञांनी अभ्यास केला.

आधीपासूनच गंभीर आजारांचा सामना करत असलेल्या लोकांना कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक असतो.

जगातील प्रत्येक पाचवी व्यक्ती कुठल्या ना कुठल्या आरोग्य विषयक समस्येने त्रस्त आहे. यामुळे, त्यांना कोरोना होण्याचा धोका अधिक आहे, असे लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या तज्ज्ञांना, या अभ्यासात आढळून आले आहे.

आधीपासूनच आरोग्य विषयक समस्यांचा सामना करत असलेल्या व्यक्तींची संख्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी आहे. युरोपात जवळपास 30 टक्के लोक एक किंवा अधिक आरोग्य विषयक समस्यांचा सामना करत आहेत.

संशोधकांनी म्हटले आहे, की जगातील 20 टक्के लोकांना कोरोनाचा गंभीर संसर्ग होऊ शकतो. मात्र, एकूण लोकसंख्येच्या केवळ 4 टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता भासेल. याचा अर्थ असा, की जगभरातील सुमारे 35 कोटी लोकांना रुग्णालयात उपचाराची आवश्यकता भासू शकते.

आतापर्यंत कोरोनामुळे जगभरात एकूण 4 लाख 20 हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.