coronavirus: समोर आलं कोरोनाचं नवं लक्षण, आता दातांमध्ये दिसून येतेय अशी समस्या By बाळकृष्ण परब | Published: November 28, 2020 01:50 PM 2020-11-28T13:50:40+5:30 2020-11-28T13:56:46+5:30
coronavirus News: कोरोना विषाणू्च्या फैलावास सुरुवात होऊन आता वर्ष उलटत आलं असलं तरी अद्याप कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी झालेला नाही. उलट दिवसागणिक कोरोनाची नवनवी लक्षणे समोर येत आहेत. कोरोना विषाणू्च्या फैलावास सुरुवात होऊन आता वर्ष उलटत आलं असलं तरी अद्याप कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी झालेला नाही. उलट दिवसागणिक कोरोनाची नवनवी लक्षणे समोर येत आहेत. न्यूयॉर्क टाइम्समधील एका वृत्तामधून कोरोनाचे अजून एक लक्षण समोर आले आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या काही रुग्णामध्ये कमजोर हिरड्या आणि दात पडण्याची समस्या दिसून आली आहे. अशा घटना कानावर आल्यानंतर तज्ज्ञांनी कोरोना विषाणू खरोखरच दातांच्या रचनेला कमकुवत करतो का याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या फराह खेमिली यांनी सांगितले की, त्यांनी एक विंटरग्रीन ब्रेथ मिंट तोंडात दाबताच त्यांना त्यांच्या दातांमधून एक विचित्र अशी सणक जाणवली. हात लावून पाहिले असता दात हलत असल्याचे त्यांना दिसून आले. सुरुवातीला हे ब्रेथ मिंटमुळे झाले असावे, असे त्यांना वाटले. मात्र प्रत्यक्षात त्याचे कारण वेगळेच असल्याचे समोर आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी तोच दात तुटून खेमिली यांच्या हातात आला. दात तुटल्यानंत ना रक्त आले ना वेदना जाणवल्या. काही दिवसांपूर्वीच खेमिली या कोविड-१९ मुळे बाधित झाल्या होत्या. तेव्हापासून त्या एका अशा ऑनलाइन सपोर्ट ग्रुपला फॉलो करत होत्या. जिथे लोकांकडून या आजाराची लक्षणे आणि अनुभव सांगितला जायचा.
मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे दात पडण्याची किंवा तुटण्याची समस्या उद्भवत असल्याबाबत आतापर्यंत कुठलेली पुरावे सापडलेले नाहीत. मात्र त्या सपोर्ट ग्रुपवर त्यांना असे काही लोक भेटले ज्यांना कोरोनाच्या संसर्गानंतर दात तुटल्याच्या किंवा हिरड्यांमध्ये संवेदनशीलता जाणवल्याचा अनुभव मांडला होता. मात्र काही दंतरोगतज्ज्ञ पुरेशी माहिती उपलब्ध नसतानाही कोविड-१९ हा दातांसंबंधी लक्षणांचे कारण ठरू शकतो, असे मानतात.
युनिव्हर्सिटी ऑफ उटाहचे पीरियडॉन्टिस डॉ. डेव्हिड ओकानो सांगतात की, कुठल्याही व्यक्तीचे दात दंतपंक्तीमधून अचानक बाहेर येणे अत्यंत आश्चर्यकारक आहे. दातांसंबंधीची ही समस्या अधिकच भयंकर ठरू शकते. या आजारामधून सावरल्यानंतरसुद्धा रुग्णांमध्ये दीर्घकाळ याचे परिणाम दिसू शकतात.
मात्र काही डेंटिस्ट आणि तज्ज्ञ याबाबत अधिक संशोधनाची गरज असल्याचे मत मांडतात. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या सन २०१२ मधील एका अहवालानुसार ३० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ४७ टक्के लोकांना पीरियडॉन्टल डिसीज, हिरड्यांमध्ये संसर्ग -इनप्लेमेशन आणि दातांच्या आजूबाजूची हाडे कमकुवत होण्याची समस्या जाणवू शकते.
रिपोर्टमधील उल्लेखानुसार कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वीसुद्धा खेमिली यांना दातांची समस्या होती. दात पडल्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या डेंटिस्टजवळ गेल्या तेव्हा त्यांना त्यांच्या हिरड्यांमध्ये कुठलाही संसर्ग नसल्याचे सांगण्यात आले. तर स्मोकिंगमुळे दातांच्या आसपासची हाडे कमकुवत झाली आहेत. त्यानंतर त्यांना कुठल्यातरी मोठ्या तज्ज्ञ डॉक्टराची भेट घेण्याचा सल्ला देण्यात आला.
मात्र ही समस्या एवढ्यापुरती मर्यादित नव्हती. खेमिलाी यांच्या सहकाऱ्याने सोशल मीडियावर सर्वाइव्हर कॉर्प नावाच्या एका पेजला फॉलो केले तिथे त्यांना समजले की, पेजच्या संस्थापक असलेल्या डायना बेरेंट यांच्या १२ वर्षांच्या मुलालासुद्धा अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला. मुलामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांचा एक दात तुटला होता. हा मुलगा अगदी तंदुरुस्त होता. तसेच यापूर्वी त्याच्या दातांमध्ये अशी समस्या दिसून आली नव्हती, असे ऑर्थोडॉन्टिस्ट यांनी सांगितले.