coronavirus: कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर हा देश झाला सावध, लष्कराकडे सोपवली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 05:26 PM2020-06-17T17:26:03+5:302020-06-17T17:39:48+5:30

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डन यांनी ती चूक मान्य केली आहे. ज्यामुळे देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. दरम्यान, नुकताच कोरोनामुक्त झालेल्या न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे नव्याने दोन रुग्ण सापडले असून, त्यानंतर या देशाच्या सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.

ब्रिटनमधील दोन महिलांनी आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी न्यूझीलंडमध्ये येण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान, न्यूझीलंडमध्ये आल्यानंतर या दोन्ही महिलांनी नियमानुसार १४ दिवसांसाठी हॉटेलमध्ये क्वारेंटिन राहणे आवश्यक होते. मात्र १४ दिवस पूर्ण होण्याआधीच या महिलांना हॉटेलमधून जाण्याची परवानगी मिळाली. मात्र या महिलांना कोरोनाचा संसर्ग असल्याचे निष्पन्न झाले.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डन यांनी या प्रकारात झालेली चूक मान्य केली आहे. तसेच आता कुठल्याही व्यक्तीला सहानुभूतीच्या आधारावर क्वारेंटिनमधून बाहेर पडण्याची परवानगी मिळणार नाही. एकदा जी चूक झाली तिची पुनरावृ्त्ती होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

या दोन्ही महिलांनी क्वारेंटिनच्या काळात ऑकलंडमधून वेलिंग्टनपर्यंतचा ६५० किमीचा प्रवास केला होता. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या शेकडो लोकांना कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.

न्यूझीलंडच्या प्रशासनाने आत या महिलांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे ३२० व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध घेण्यात आला आहे.

तपासणीशिवास दोन्ही महिलांना क्वारेंटिनमधून जाण्याची परवानगी देणे हे प्रशासनाचे अपयश आहे. ही बाब अस्वीकारार्ह आहे. कोरोनामुक्त झालेल्या न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे दोन नवे रुग्ण सापडल्यानंतर देशातील विरोधी पक्षाने आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

दरम्यान, क्वारेंटिन सुविधेच्या नियमाचे पालन करण्यासाठी आता लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे जसिंडा अर्डन यांनी सांगितले. तत्पूर्वी २४ दिवसांपर्यंत देशात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता.

आठ जूनला देशातील कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा झाल्याची बातमी ऐकल्यानंतर मी मुलीसोबत डान्सही केला होता, असेही न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी सांगितले.