CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 01:28 PM2020-08-15T13:28:47+5:302020-08-15T13:46:55+5:30

अमेरिकन कोरोना लस प्रभावी आहे की नाही, हे समजण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. आता अमेरिकेने एक नवीन कोरोना व्हायरस स्ट्रेन तयार करायला सुरुवात केली आहे. जिच्या सहाय्याने लस घेणाऱ्या स्वस्थ स्वयंसेवकांना जानूनबुजून संक्रमित करता येऊ शकते.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन सरकारच्या आरोग्य संस्थेने म्हटले आहे, की ह्यूमन चॅलेन्ज ट्रायलसाठी काम सुरू करण्यात आले आहे.

सर्वसामान्यपणे लसीच्या परीक्षणादरम्यान स्वयंसेवकांना डोस देण्यात येतो आणि त्यांतील काही लोक व्हायरसच्या संपर्कात येण्याची वाट पाहिली जाते. यानंतर यातील जे लोक व्हायरसच्या संपर्कात येतात, त्यांच्यावर झालेल्या परिणामांचा अभ्यास केला जातो. जर ते आजारी पडले नाही, तर लस यशस्वी असल्याचे मानले जाते.

स्वयंसेवक स्वतःहून व्हायरसच्या संपर्कात यायला उशीर लागू शकतो आणि परीक्षणालाही उशीर लागू शकतो. यामुळेच अमेरिकेने एक नवा कोरोना व्हायरस स्ट्रेन तयार करून स्वयंसेवकांनाच संक्रमित करण्यावर काम सुरू केले आहे. यालाच ह्यूमन चॅलेन्ज ट्रायल, असे म्हटले जाते.

मात्र अशा पद्धतीच्या परीक्षणावर वादही होत राहिला आहे. कारण, ह्यूमन चॅलेन्ज ट्रायलमध्ये सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. कारण लस सुरक्षितता देईलच, याची खात्री देता येत नाही.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत नवा कोरोना व्हायरस स्ट्रेन तयार करण्याचे काम सुरुवातीच्याच टप्प्यावर आहे. जर ह्यूमन चॅलेन्जला परवानगी मिळाली, तर ही ट्रायल आधीपासूनच सुरू असलेल्या फेज-3 ट्रायलपेक्षा वेगळी असेल.

लस तयार करणारी कंपनी एस्ट्राजेनेका आणि जॉन्सन अँड जॉन्सननेही म्हटले आहे, की आवश्यकता पडल्यास ह्यूमन चॅलेन्ज ट्रायलवरही विचार केला जाईल.

कोरोना व्हायरस आजारावर अद्याप कसल्याही प्रकारचे औषध नाही. यामुळे ह्यूमन चॅलेन्ज ट्रायल धोकादायक मानली जात आहे.

मात्र, वैज्ञानिकांनी मूळ कोरोना व्हायरसच्या तुलनेत कमी धोकादायक असलेला कोरोना व्हायरस स्ट्रेन तयार केल्यास ह्यूमन चॅलेन्ज ट्रायल सोपी होऊ शकते.

जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ ने तयार केलेल्या लसीचे संशोधक एन्ना डर्बिन यांचे म्हणणे आहे, की ह्यूमन चॅलेन्ज ट्रायल सुरू करायलाही 9 ते 12 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. तसेच यानंतर निकाल संकलित करायलाही साधारणपणे सहा मिहिन्यांचा कालावधी लागू शकतो.