coronavirus: जगात कुठेही विकसित झाली नाही हर्ड इम्युनिटी, WHO ने केलं स्पष्ट; आता कोरोनाविरोधात उरला हा एकमेव पर्याय By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 12:30 AM 2020-08-19T00:30:16+5:30 2020-08-19T00:40:50+5:30
कोरोना विषाणूविरोधात आपल्याकडे हर्ड इम्युनिटी विकसित होत असल्याचे दावे जगातील विविध भागातून करण्यात येत आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने हे दावे फेटाळून लावले आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे जगामध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, कोरोना विषाणूविरोधात आपल्याकडे हर्ड इम्युनिटी विकसित होत असल्याचे दावे जगातील विविध भागातून करण्यात येत आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने हे दावे फेटाळून लावले आहेत. जगात कुठेही हर्ड इम्युनिटी विकसित होण्यासारखी परिस्थिती नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या काही संशोधकांनी ब्रिटनमधील लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित होत असल्याचा दावा केला होता. ब्रिटनमधील लोकांमध्ये सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गजन्य आजारांमुळे सामुहिकपणे हर्ड इम्युनिटीचा स्तर इतका आहे की ते धोकादायक कोरोना विषाणूचा पुन्हा फैलाव झाल्याच त्याचा सामना करू शकतात, असे संशोधनांनी म्हटले होते.
जग हर्ड इम्युनिटीच्या स्थितीत नाही डब्ल्यूएचओच्या आपातकालीन बाबींचे प्रमुख डॉक्टर मायकर रेयॉन यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत हर्ड इम्युनिटीचा दावा फेटाळून लावला. आपण हर्ड इम्युनिटीची अपेक्षा बाळगता कामा नये. जागतिक लोकसंख्येचे स्वरूप पाहता आपण कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक हर्ड इम्युनिटीच्या आसपासही नाही.
हर्ड इम्युनिटी हा कोरोनावरील उपाय नाही कोरोना विषाणूवर हर्ड इम्युनिटी हा उपाय ठरू शकत नाही. तसेच त्याबाबत आपण फार अपेक्षाही बाळगू शकत नाही. आतापर्यंतच्या बहुतांश अभ्यासानुसार केवळ १० ते २० टक्के लोकसंख्येमध्येच कोरोनाविरोधातील अँटिबॉडी आहेत. मात्र एवढ्या कमी प्रमाणातील अँटिबॉडीच्या मदतीने आपण हर्ड इम्युनिटी मिळवू शकणार नाही.
केवळ लसीच्या माध्यमातून मिळवता येईल हर्ड इम्युनिटी हर्ड इम्युनिटीबाबत वेगवेगळे दावे होत असताना आता डब्ल्यूएचओने कोरोनाविरोधातील विशेष लसीच्या माध्यमातूनच हर्ड इम्युनिटी विकसित केली जाऊ शकेल, असे स्पष्ट केले आहे. तज्ज्ञांच्या मते कोरोनाला मात देण्यासाठी एकूण लोकसंख्येच्या ७० टक्के लोकांमध्ये कोरोनाला रोखणाऱ्या अँटिबॉडी विकसित होणे गरजेचे आहे.
जगातील ५० टक्के लोकसंख्येला कोरोनाविरोधातील लसीची गरज डब्ल्यूएचओच्या महासंचालकांचे वरिष्ठ सल्लागार डॉ. ब्रुस एलवार्ड यांनी सांगितले की, कुठल्याही कोरोना विषाणूच्या लसीच्या व्यापक लसीकरणाचा उद्देश हा जगातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला या लसीकरणाच्या चौकटीत आणण्याचा असेल.
हर्ड इम्युनिटी म्हणजे काय? ती कशी विकसित केली जाते? हर्ड इम्युनिटी हे कुठल्याही वैद्यकीय प्रक्रियेचे नाव नाही. जर कुठलाही संसर्गजन्या आजार पसरला तर हर्ड इम्युनिटी ती अवस्था असते ज्यामध्ये लोकसंख्येमधील एक ठराविक भाग त्या आजाराविरोधात प्रतिकारशक्ती मिळवतो. त्यामुळे इतर लोकसंख्या आजारापासून वाचते. सर्वसाधारणपणे हर्ड इम्युनिटी हा शब्द लसीकरणाच्या संदर्भात वापरला जातो. मात्र हर्ड इम्युनिटी ही अधिकाधिक लोकांना संसर्ग होऊन त्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती विकसित झाल्यावरच मिळू शकते. निश्चित प्रमाणावर लोक बाधित झाले की ते इतरांपर्यंत संसर्ग पोहोचवू शकत नाहीत, अशा परिस्थितीत कम्युनिटी ट्रान्समिशनची चेन तुटते.