CoronaVirus चीनचा कांगावा! म्हणे "आमचे टेस्टिंग किट उत्तम, भारतीयांनाच वापरायचे ज्ञान नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 12:16 PM2020-04-25T12:16:46+5:302020-04-25T12:30:50+5:30

CoronaVirus राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये या किटवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले होते. सुरुवातीला राजस्थानमध्ये १२०० लोकांची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये केवळ दोघांचेच अहवाल पॉझिटिव्ह आले होते. या किट्सची अॅकयुरेसी ९० टक्के असायला हवी होती. ती केवळ ५ टक्के आहे. यामुळे देशभरातून चीनने फसवल्याची भावना निर्माण झाली होती.

कोरोना व्हायरस जगभर पसरविणाऱ्या चीनने आता जगभरातील देशांसोबत फसवणुकीचे धंदे सुरु केले आहेत. भारताला तब्बल साडे सहा लाख खराब गुणवत्तेच्या टेस्टिंग किट पाठविणाल्यानंतर भारत सरकारने चीनचा पैसा रोखला आहे. तसेच हे सर्व किट परत करण्यात येणार असल्याचे चीनच्या कंपन्यांना कळविले आहे. यावर चीनच्या कंपन्यांनी उलट भारतीयांनाच दोष दिला आहे.

खराब टेस्टिंग किटवरून वातावरण तापलेले असताना चीनच्या पुरवठादार कंपन्यांनी यावर खुलासा केला आहे. चीनची कंपनी गुआंगजौ वोन्डफो बायोटेक आणि झुवाई लिवजोन डायग्नोस्टिक्स इंक या दोन कंपन्यांना या रॅपिड टेस्टिंग किटचा पुरवठा केला होता.

या कंपन्यांनी भारताचा दावा फेटाळून लावताना म्हटले की आम्ही गुणवत्ता तपासूनच किट निर्यात करतो. गुणवत्ता आमच्यासाठी प्राथमिकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमच्या रॅपिड अँटीबॉडी टेस्टिंग किट या उच्च गुणवत्तेच्या आहेत. किटमध्ये काहीही समस्या नाही, तर भारतीय आरोग्य कर्मचाऱ्यांना ते वापरता येत नसल्याचा आरोप चीनने केला आहे.

आमचे किट्स जगभरात वापरले जात आहेत. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आलेल्या नाहीत. भारताने त्यांच्या कर्मचाऱ्यांना युजर मॅन्युअलनुसार प्रक्रिया करण्यास सांगावे, असा कांगावा चीनने केला आहे.

आम्ही पुण्यातील एनआयव्हीच्या मदतीने आयसीएमआरकडून टेस्टिंग किट पुरविण्याची परवानगी घेतलेली आहे. जगातील ७० देशांना या किटचा पुरवठा होत आहे. जवळपास १८ दशलक्ष किट पाठविण्यात आली आहेत, असे या कंपन्यांनी स्पष्ट केले.

भारताने यावर कडक भूमिका घेतली असून चीनकडून आलेली पाच लाख रॅपिड टेस्टिंग किट परत चीनला परत केली जाणार असल्याचे भारत सरकारकडून सांगण्यात आले आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितली आहे.

राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये या किटवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले होते. सुरुवातीला राजस्थानमध्ये १२०० लोकांची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये केवळ दोघांचेच अहवाल पॉझिटिव्ह आले होते. या किट्सची अॅकयुरेसी ९० टक्के असायला हवी होती. ती केवळ ५ टक्के आहे. यामुळे देशभरातून चीनने फसवल्याची भावना निर्माण झाली होती.

दोन राज्यांनी आक्षेप घेतल्यानंतर आयसीएमआरनेही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून आता मोदी सरकार अॅक्शनमध्ये आले आहे.

भारताचे तज्ज्ञ डॉक्टर मुबाशीर अली यांनी चीनवर आरोप करताना म्हटले आहे की, चीनी कंपन्यांनी घाईघाईमध्ये ही किट बनविली आहेत. ही किट जगभरात पाठविण्याआधी त्यांची चाचणी घेतलेली नाही. जगाची मागणी वाढल्याने त्याचा फायदा उठविण्यासाठी चीनच्या कंपन्यांनी हे कृत्य केले आहे.

चीनने भारतीय बाजारातील घसरगुंडी पाहून संधीचे सोने करण्यासाठी पैसा ओतायला सुरुवात केली होती. मात्र, मोदी सरकारने यावर रोख लावली आहे.