coronavirus: रिपोर्टरने मास्क न घालताच प्रश्न विचारला, समोरील व्यक्ती म्हणाली मला कोरोना झाला! By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 12:08 PM 2020-07-20T12:08:54+5:30 2020-07-20T12:17:07+5:30
मास्क न लावता रिपोर्टिंग करणे एका पत्रकाराला चांगलेच महागात पडले आहे. याबाबतचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण जगच चिंतेत पडलेले आहे. त्यामुळे आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जो तो आपल्यापरीने काळजी घेत आहे. त्यासाठी मास्कचा वापर करण्याची खबरदारी घेतली जात आहे.
मात्र अनेकदा घाईगडबडीत मास्क लावणे विसरले जाते. तर कधी मास्क नाका तोंडावर व्यवस्थित न लावता कसाही लावला जातो. मात्र असा मास्क न लावता रिपोर्टिंग करणे एका पत्रकाराला चांगलेच महागात पडले आहे. याबाबतचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सध्या भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. याचदरम्यान हा पाकिस्तानी रिपोर्टर मास्क न लावताच रिपोर्टिंगसाठी बाहेर पडला होता. मात्र या दरम्यान, त्याने विचारलेल्या प्रश्नाला एका व्यक्तीने दिलेल्या धक्कादायक उत्तरामुळे या रिपोर्टरची चांगलीच फजिती झाली आहे.
व्हायरल असलेल्या या व्हिडीओमधील एका खाजगी वृत्तवाहिनीचा रिपोर्टर पेशावरमध्ये असलेल्या पेट्रोलच्या टंचाईबाबत रिपोर्टिंग करत होता. दरम्यान, या पत्रकाराने रस्त्यावरून जात असलेल्या एका दुचाकीस्वाराला थांबवून शहरात असलेल्या पेट्रोलच्या टंचाईबाबत प्रश्न विचारला. मात्र त्याला संबंधित दुचाकीस्वाराने जे उत्तर दिले ते खूप धक्कादायक होते.
सुरुवातीला या दुचाकीस्वाराने शहरात पेट्रोल मिळत नसल्याचे सांगितले. मात्र नंतर मला कोरोना झाला असून, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मी रुग्णालयात जात असल्याचे सांगितले, त्यामुळे प्रश्न विचारणाऱ्या रिपोर्टरच्या डोक्याला आठ्या पडल्या.
आता हा व्हिडिओ अनस मलिक नामक पाकिस्तानी पत्रकाराने शेअर केला आहे. अनस मलिकने दिलेल्या माहितीनुसार या रिपोर्टरचे नाव अदनान तारिक असून, तो पेशावरमध्ये रिपोर्टिंग करतो. मात्र सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला असून, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
सोशल मीडियावर या व्हिडीओबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींच्या मते या रिपोर्टरची फसगत झाली आहे. तर काही जण रिपोर्टरने तोंडावर मास्क लावूनच रिपोर्टिंग केले पाहिजे, असा सल्ला देत आहेत.