Omicron Variant: मोठा दिलासा! द. आफ्रिकेत ओमायक्रॉन नियंत्रणात यश; नाइट कर्फ्यू हटवला, रुग्णसंख्याही घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 02:21 PM2022-01-01T14:21:46+5:302022-01-01T14:26:11+5:30

Omicron Variant: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता.

भारतात आताच्या घडीला कोरोनासह नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. मात्र, ओमायक्रॉन व्हेरिएंटचा मूळ प्रसार ज्या ठिकाणाहून जगभरात झाला, त्या दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती मिळाली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. परंतु, मृत्यूच्या संख्येत किरकोळ वाढ झाल्याचे सरकारने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील नाइट कर्फ्यूचे नियमही हटवले आहेत.

दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर तेथे कडक निर्बंध लागू करण्यात आले. परिणामी, दक्षिण आफ्रिकेतील रुग्ण संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे देशातून कोरोनाचे इतर निर्बंधही शिथिल केले जाणार आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) डेल्टा आणि ओमायक्रॉन संक्रमणांच्या लाटेबद्दल संपूर्ण जगाला सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र, आता दक्षिण आफ्रिकेतील रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली. आफ्रिकेच्या जवळजवळ सर्व राज्यांमधील रुग्णांच्या संख्येत घट झाली. तर, दररोज रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांच्या दरातही घट झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या विशेष मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या निवेदनात यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. डिसेंबर २०२१ च्या तिसऱ्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत १ लाख २७ हजार ७५३ नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र, डिसेंबरच्या चौथ्या आठवड्यात रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. शेवटच्या आठवड्यात ८९ हजार ७८१ रुग्णांची नोंद करण्यात आली.

दक्षिण आफ्रिकेतून नाइट कर्फ्यू हटवण्यात आला आहे. तसेच सामान्य परवाना नियमांनुसार व्यवसायांना मद्य विक्रीची परवानगी दिली जाणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी एक हजार आणि खुल्या जागेत दोन हजार जणांना परवानगी असेल. जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना कार्यक्रमात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक असून सार्वजनिक आरोग्य प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, नॅशनल कोरोनाव्हायरस कमांड कॉन्सिल येथील कोरोना परिस्थितीचे निरीक्षण करणार आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यास आणि रुग्णालयावर ताण येऊ लागल्यास पुन्हा निर्बंध कडक केले जातील, असाही इशारा देण्यात आलाय. दक्षिण आफ्रिकेत जवळपास ३.५ दशलक्ष कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेत अन्य देशांच्या तुलनेत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेत कोरोनामुळे ९० हजारांहून अधिक नागरिकांनी प्राण गमावले आहेत. दरम्यन, गेल्या २४ तासांत भारतात २२ हजार ७७५ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून ४०६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

ओमायक्रॉनबाधितांचा आकडा आता १४३१ इतका झाला आहे. देशात सध्या १ लाख ४ हजार ७८१ अॅक्टिव केसेस असून रिकव्हरी रेट ९८.३२ टक्के इतका आहे. देशात आता डेल्टा विषाणूची जागा ओमायक्रॉन संसर्गाने घेण्यास सुरुवात झाली आहे. विदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांपैकी ८० टक्के लोक हे ओमायक्रॉनचे बाधित असतात.

कोरोना चाचण्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेली घट चांगली नाही, असा इशारा केंद्र सरकारने १९ राज्यांना नुकताच दिला होता. ओमायक्रॉनमुळे संसर्गाचे प्रमाण खूपच वाढणार आहे, याकडेही केंद्राने लक्ष वेधले होते.

कोरोनातून बरे झालेल्या तसेच फायझरच्या लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांच्या शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीजना ओमायक्रॉन दाद देत नसल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. ओमायक्रॉन फेब्रुवारी महिन्यात पिक वर असेल, परंतु रुग्णांची संख्या अधिक नसेल, असे सांगितले जात आहे.