coronavirus: घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 09:12 AM 2020-07-22T09:12:35+5:30 2020-07-22T10:23:44+5:30
कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनसारखे उपाय केले गेले आहेत. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र... कोरोना विषाणूचा झपाट्याने होत असलेला संसर्ग ही सध्या जागतिक चिंतेची बाब बनलेली आहे. औषध सापडेपर्यंत कोरोनाला रोखण्यासाठी नेमके काय उपाय करावेत याबाबत सध्या जगभरातील संशोधकांकडून अभ्यास सुरू आहे.
कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनसारखे उपाय केले गेले आहेत. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र घरी राहिल्यानंतरही कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी होत नाही, अशी धक्कादायक माहिती नव्या संशोधनातून समोर आली आहे.
तुम्ही घरबसल्याही कोरोनामुळे संक्रमित होऊ शकता असा धक्कादायक दावा दक्षिण कोरियातील शास्त्रज्ञांनी केला आहे. घरात असलेले सामान आणि बाहेरून येणाऱ्या सामानामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची संपूर्ण शक्यता आहे, असे कोरियन शास्रज्ञांनी म्हटले आहे.
दक्षिण कोरियातील संशोधकांनी केलेले हे अध्ययन यूएस सेंटर्स फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) मध्ये १६ जुलै रोजी प्रसिद्ध झाले आहे. सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग झालेले ५ हजार ७०६ रुग्ण आणि नंतर बाधित झालेल्या ५९ हजार जणांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
दर १०० व्यक्तींपैकी केवळ दोन जणांना बाहेरील कारणांमुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे. म्हणजेच ते घराबाहेर कोरोना संक्रमित झाले. तर दर दहामधील एका व्यक्तीला त्यांच्या घरातील सदस्यांच्या माध्यमातूनच कोरोनाचा संसर्ग झाल्याचा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे.
कोरोनाच्या संसर्गावर वयोमानाचाही कुठलाही परिणाम झालेला नाही. घरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाचा कोरोनाने आपली शिकार बनवले आहे. मात्र घरात राहणारे तरुण आणि जेष्ठ नागरिकांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे.
कोरिया सेंटर्स फॉर डिजीस कंट्रोल अॅँड प्रिव्हेंशनचे संचालक जियोंग ईयून किंयोंग यांनी सांगितले की, तरुण आणि जेष्ठ नागरिक हे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या जवळ राहत असतात. त्यामुळे त्यांच्या संक्रमणाची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत या दोन्ही वयोगटातील लोकांना विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे.
हॅलिम विद्यापीठ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. चो यंग जून यांनी सांगितले की, ९ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी आहे. बहुतांश मुले असिम्थमॅटिक असतात. म्हणजेच त्यांच्यामध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे कोरोनामुळे त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यात अडथळे येतात.
दरम्यान, कोरोना विषाणूहा कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला सोडत नाही आहे. तो प्रत्येकाला आपली शिकार बनवत आहेत. अशा परिस्थितीत केवळ घरात राहिल्याने तुम्ही सुरक्षित राहू शकत नाही. तुम्हाला घरातसुद्धा सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे लागेल. तसेच खबरदारीच्या उपायांचे पालन करावे लागेल, असा सल्ला डॉ. चो. यंग यांनी दिला आहे.