Coronavirus: कोरोनाच्या ‘या’ व्हेरिएंटनं चीनमध्ये हाहाकार; १० शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन, भारताला किती धोका?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 09:33 AM2022-03-16T09:33:56+5:302022-03-16T09:37:44+5:30

भारतासह संपूर्ण देशात सध्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे. भारतात मागील १ आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत २ वर्षाच्या तुलनेत कमालीची घट झाली. एकीकडे भारतात कोरोनाचा प्रभाव कमी होतोय तर दुसरीकडे चीनमध्ये पुन्हा कहर पाहायला मिळत आहे.

ज्या देशात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. तिथे पुन्हा कोरोना नियंत्रणाबाहेर जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. मागील ३ दिवसांत चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत तब्बल ९ पटीनं वाढ झाल्यानं चीन सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

चीनमध्ये १२ फेब्रुवारी २०२० मध्ये सर्वाधिक १४ हजार रुग्ण आढळले होते. परंतु त्यानंतर काही दिवस वगळता कोरोना रुग्णसंख्या २०० च्यावर गेली नाही. वुहानमध्ये पहिल्यांदा कोरोना रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आला होता.

यावर्षीच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोना महामारीचा प्रभाव पाहायला मिळत आहे. २८ डिसेंबरला चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या २०९ इतकी होती. तेव्हापासून आतापर्यंत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. १० मार्चला रुग्णसंख्या पहिल्यांदा ५०० च्यावर पोहचली आहे.

मागील ३ दिवसांत चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली असून शुक्रवारी ५८८ रुग्ण आढळले तर शनिवारी ही संख्या वाढून १९३८ रुग्णांपर्यंत पोहचली. तर सोमवारी संक्रमित रुग्णसंख्या ५ हजार २८० इतकी आढळली. म्हणजे एका दिवसांत ३ पटीने आणि शुक्रवारपासून ९ पटीनं रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

चीनमध्ये ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंट आल्यानंतर जानेवारीपासून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. परंतु त्यावर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश आले. परंतु आता चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढीला ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट ‘स्टेल्थ ओमायक्रॉन’ कारण असल्याचं उघड झालं आहे.

विशेष म्हणजे हा सब व्हेरिएंट नवीन नव्हे तर चीनच्या आधी काही देशांमध्ये याचा प्रभाव पाहायला मिळाला. ओमायक्रॉनच्या स्टेल्थ व्हेरिएंटमुळे(Stealth omicron) रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. हे पाहता चीनने पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू केला आहे.

चीनमध्ये प्रत्येक रुग्णाला शोधून त्याला आयसोलेट करण्यावर भर दिला जात आहे. त्याशिवाय कोरोना प्रभावित क्षेत्र आणि शहरांमध्ये टेस्टिंगचे आकडे वाढवले आहेत. चीनमध्ये वाढणाऱ्या नव्या रुग्णसंख्येमुळे आतापर्यंत १० शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

चीनमध्ये ३ कोटींहून अधिक नागरिकांना पुन्हा घरात कैद केले आहे. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चीनने कठोर पाऊल उचलली आहेत. चीनच्या जिलीन प्रांतात एकाच दिवशी ३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

स्टेल्थ ओमायक्रॉन व्हेरिएंट जगातील ६० देशांत डिटेक्ट झाला होता. त्यात दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, डेनमार्क आणि भारताचाही समावेश होता. ज्या व्हेरिएंटमुळे चीनमध्ये रुग्णसंख्येत वाढ होतेय त्याचा प्रभाव भारतात आधीच झाला आहे. त्यामुळे आता चीनमधील लाटेचा परिणाम होण्याची शक्यता फार कमी आहे.

चीनसारखी कोरोना लाट भारतात येण्याची शक्यता कमी आहे कारण आतापर्यंत भारतात १०० टक्के लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस का होईना पण घेतला आहे. त्यामुळे गंभीर संक्रमणापासून ते सुरक्षित आहेत. अनेक स्टडीत संक्रमणातून निर्माण होणारी इम्युनिटी ही लसीपासून मिळणाऱ्या इम्युनिटीपेक्षा जास्त प्रभावी असल्याचं म्हटलं आहे.