Coronavirus : कोरोनापासून सूर्यकिरणे तारणार, व्हायरस क्षणात नष्ट होतो; अमेरिकन शास्त्रज्ञांचा मोठा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 12:37 PM 2020-04-24T12:37:34+5:30 2020-04-24T13:25:14+5:30
Coronavirus : काही दिवसांपूर्वी उन्हाळा वाढला तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार असं शास्त्रज्ञांनी अधोरेखित केलं होतं. त्यानंतर आता कोरोना व्हायरस सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतो असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे.
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 190,654 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 27 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 745,620 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी उन्हाळा वाढला तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार असं शास्त्रज्ञांनी अधोरेखित केलं होतं. त्यानंतर आता कोरोना व्हायरस सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतो असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे.
होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी विभागाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार विलियम ब्रायन यांनी याबाबत माहिती दिली आहे.
सरकारी शास्त्रज्ञांनी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा कोरोना व्हायरसवर परिणाम होत असल्याचा शोध लावला आहे. यामुळे उन्हाळ्यात कोरोनाचा संसर्ग कमी होईल अशी आशा निर्माण झाल्याची माहिती ब्रायन यांनी दिली आहे.
सूर्याची किरणे जमीन आणि हवा अशी दोन्ही ठिकाणी कोरोना व्हायरस नष्ट करत असल्याचं निरिक्षणातून समोर आलं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
तापमान आणि आर्द्रता अशा दोन्ही ठिकाणी आम्ही पाहणी केली असता तोच परिणाम होत असल्याचं आमच्या लक्षात आलं. तापमान आणि आर्द्रता वाढवणं कोरोना व्हायरससाठी कमी अनुकूल असल्याचं देखील यामध्ये म्हटलं आहे.
अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा हा रिसर्च अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. समिक्षा करण्यासाठी हा रिसर्च पाठवण्यात येणार आहे. यानंतरच तज्ञ हा दावा कितपत खरा आहे याबद्दल सांगतील.
अल्ट्राव्हायोलेट किरणांमध्ये निर्जंतुकीकरण प्रभाव असल्याचा दावा याआधी करण्यात आला आहे. तसेच हा प्रयोग करताना अल्ट्राव्हायोलेट किरणांची तीव्रता कितपत होती हा पण महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
21 ते 24 डिग्री सेल्सियस ( 70 ते 75 डिग्री फारनेहाइट) तापमानामध्ये (20 टक्के आर्द्रता) 18 तासांमध्ये व्हायरस हा अर्ध्याहून जास्त नष्ट होतो. दरवाजाचं हँडल आणि स्टेनलेस स्टीलवरपण याचा परिणाम दिसून आल्याचं म्हटलं आहे.
आर्द्रता 80 वाढवल्यानंतर कोरोनाचे विषाणू सहा तासांत नष्ट होतात. मात्र जेव्हा हे परीक्षण सूर्यकिरणांमध्ये केलं गेलं तेव्हा याचा उत्तम परिणाम दिसून आला. नष्ट होण्यासाठी केवळ दोन मिनिटांचा वेळ लागल्याची माहिती देण्यात आली आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने थैमान घातले आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे.
अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा आठ लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे.
जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत तब्बल 3,176 लोकांचा मृत्यू झाला असून हा मोठा आकडा आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या ही जवळपास 50 हजार झाली आहे.
जगातल्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटी आणि संस्थांनी केलेल्या अभ्यासानुसार, थंडी जाईल आणि वातावरणात बदल होईल. उन्हाळ्यात तापमानाचा पारा आणखी चढणार असून, कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येणार आहे. काही दिवसांपूर्वी ही माहिती समोर आली होती.
भारतात तापमानाचा पारा खाली असला तरी लवकरच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोरोनापासून मुक्तता मिळण्याच्या आशा वाढल्या आहेत. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एमआयटीनंही भारतात सकारात्मक बदल दिसेल, अशी आशा व्यक्त केली होती.