coronavirus: अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 08:46 AM2020-07-23T08:46:38+5:302020-07-23T08:55:32+5:30

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेला कोरोनाविरोधातील औषध मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेला कोरोनावरील लसीचे १० कोटी डोस मिळाल्याचा दावा एएफपी या वृत्तसंस्थेने केला आहे.

कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी लॉकाडाऊन, सोशल डिस्टंसिंग असे उपाय करून झाल्यानंतर आता जगाचे लक्ष कोरोना विषाणूविरोधात येणाऱ्या लसीकडे लागले आहे. जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोनाविरोधातील लसीवर काम सुरू आहे.

दरम्यान, कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेला कोरोनाविरोधातील औषध मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेला कोरोनावरील लसीचे १० कोटी डोस मिळाल्याचा दावा एएफपी या वृत्तसंस्थेने केला आहे.

जर्मन औषध कंपनी असलेल्या बायोएनटेककडून (BioNTech) अमेरिकेला कोरोनाचे डोस मिळाले आहेत. त्यासाठी १.९५ अब्ज एवढी रक्कम अमेरिकेने मोजल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

यापूर्वी रशियामध्येही कोरोनाने लस तयार केल्याचे वृत्त समोर आले होते. तसेच रशियामधील अनेक अब्जाधीश आणि धनाढ्य लोकांनी कोरोनावरील लस टोचून घेत स्वत: ला कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित करून घेतल्याचे वृत्त ब्लूमबर्गने दिले होते.

दरम्यान, कोरोनाविरोधातील लसीची निर्मिती करण्यामध्ये रशियाचे संशोधक सर्वात आघाडीवर असून, त्यांची मानवी चाचणीसुद्धा पूर्ण झाली आहे. एवढेच नव्हे तर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासह अनेकांनी एप्रिल महिन्यातच कोरोनाची लस टोचून घेतली होती, असा दावा करण्यात येत आहे.

कोरोना चाचण्यांचा विचार केल्यास सद्यस्थितीत अमेरिकेमध्ये जगातील कुठल्याही देशापेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. तसेच तिथे दररोज तब्बल साल लाख कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. बुधवारपर्यंत अमेरिकेत सुमारे ४ कोटी ९० लाखहून अधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

तर भारताचा विचार केल्यास भारतात दररोज साडे तीन लाखांहून अधिक कोरोना चाचण्या होत आहेत. तसेच भारतातील कोरोना चाचण्यांचा आकडा दीड कोटींच्या जवळ पोहोचला आहे.

बुधवारी, व्हाइट हाऊस येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्र्म्प यांनी सांगितले की, जगातील सर्वाधिक कोरोना चाचण्या अमेरिकेत होत आहेत. त्यामुळे अमेरिकेमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. लवकरच आम्ही ५० मिलियन चाचण्यांचा टप्पा पूर्ण करून. आमच्यानंतर केवळ भारत आहे जिथे सर्वाधिक चाचण्या होत आहेत. दरम्यान, अमेरिकेतील अनेक कंपन्या कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.