CoronaVirus News : कोरोना लसीवरून अमेरिकेचा जगाला धक्का, चिंता वाढली! By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 03:46 PM2020-09-02T15:46:03+5:302020-09-02T16:04:33+5:30Join usJoin usNext कोरोनावरील लस आणि औषध शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. अशातच, कोरोना लस तयार करण्यासाठी उप्तादन आणि समान वितरणाच्या उद्देशाने बनविण्यात येणाऱ्या जागतिक समूहासोबत जाण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सहकार्याने ग्लोबल अॅक्सेस फॅसिलिटी 'कोव्हॅक्स' (Covax) तयार केली गेली आहे. जेणेकरुन कोरोना लसीबद्दल वेगवेगळे देश एकमेकांशी संपर्क साधू शकतील आणि प्रत्येकाला ही लस त्वरीत मिळू शकेल. 'कोव्हॅक्स'साठी भागीदार होणार नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. कारण, याचे सह नेतृत्व जागतिक आरोग्य संघटना करत आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने Coalition for Epidemic Preparedness Innovations आणि Gavi यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोव्हॅक्स'ची स्थापना केली आहे. 'कोव्हॅक्स'मध्ये सामील होण्यासाठी 31 ऑगस्टची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते की, १७९ देशांसोबत चर्चा सुरु आहे. लस तयार झाली की ती वेगवेगळ्या देशांमध्ये समान प्रमाणात वितरित करता येऊ शकेल, असा 'कोव्हॅक्स'चा एक उद्देश आहे. कोरोनावर लस तयार करण्यासाठी अमेरिकेने स्वत:च वेगाने प्रयत्न सुरु केले आहेत. अमेरिका राष्ट्राध्यक्ष भवनाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "अमेरिका कोरोनाला पराभूत करण्यासाठी आपल्या आंतरराष्ट्रीय भागीदारांसह काम करेल, परंतु भ्रष्ट जागतिक आरोग्य संघटना आणि चीनच्या प्रभावाखाली काम करणाऱ्या संघटनेचा भाग होणार नाही." मे महिन्यात अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेपासून स्वत: ला वेगळे करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर निधीपुरवठा करण्यास बंदी घातली. याआधी अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक निधी दिला जात होता. दरम्यान, 'कोव्हॅक्स'मध्ये सामील न होण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका स्वत: ही लस तयार करत आहे आणि इतर देशांनाही ते करण्यास प्रवृत्त करीत आहे. परंतु अशा परिस्थितीत लसीची साठवणूक होऊ शकते आणि ही लस महाग असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. जिनिव्हा येथील ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये ग्लोबल हेल्थ सेंटरचे सह-संचालक सूरी मून यांनी सांगितले की, 'कोव्हॅक्स'ध्ये अमेरिकेचा समावेश नसल्यामुळे ही लस सुरक्षित ठेवण्याच्या जागतिक प्रयत्नांना खरोखरच धक्का बसला आहे. साथीच्या आजारात लसीबाबत देशाचा दृष्टीकोन केवळ सर्वसामान्यांच्या आरोग्यावरच परिणाम होणार नाही तर त्याचे राजकीय परिणामही भोगावे लागतील. अमेरिकेने जानेवारी 2021 पर्यंत 30 दशलक्ष लस डोस तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या दिवसापर्यंत ही लस सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, तज्ज्ञांना चिंता आहे की, लसची चाचणी व मान्यता घेण्यासाठी अधिक वेळ आवश्यक आहे. कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअमेरिकाजागतिक आरोग्य संघटनाcorona virusAmericaWorld health organisation