CoronaVirus कोरोनाचे जगभरात थैमान; अमेरिकेमध्ये चार भारतीयांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 12:38 AM2020-04-07T00:38:43+5:302020-04-07T00:43:47+5:30

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर युरोप, अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा कमालीचा वाढला आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर युरोप, अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा कमालीचा वाढला आहे. जगभरात एकूण ७४००० मृत्यू झाले असून रुग्णांचा आकडाही १३,२८००० लाखांवर गेला आहे. भारतातही कोरोनाने पाळेमुळे रोवायला सुरुवात केली आहे. अशातच अमेरिकेतून एक वाईट बातमी येत आहे.

कोरोना विषाणूमुळे येथे चार भारतीयांचा मृत्यू झाला आहे. मल्याळी स्थलांतरितांच्या संघटनेने याची पुष्टी केली असून उत्तर अमेरिकेमध्ये ही घटना घडली आहे. द फेडरेशन ऑफ केरळ असोसिएशन इन नॉर्थ अमेरिका (FOKANA) या संघटनेने सांगितले की न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच भारतीय दुतावासानेही याची पुष्टी केली असून या सर्व कुटुंबांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.

अलेयम्मा कुरियाकोसे (65), टी एंचेनत्तु (51), अब्राहम सैम्युएल (45) आणि शॉन अब्राहम (21) असे चार मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. संघटनेने समाजातील लोकांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे.

अमेरिकेधील न्यूयॉर्क हे राज्य कोरोना व्हायरसच्या उद्रेकाचे केंद्र बनने आहे. या राज्यात आतापर्यंत ११३००० कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर फक्त न्यूयॉर्क शहरामध्ये ६३ हजाराहून अधिक रुग सापडले असून २६२० लोकांचा मृत्यू झाला आहे. 4 एप्रिलला न्यूयॉर्कमध्ये २४ तासांत ६३० लोकांचा मृत्यू झाला होता. हा अन्य राज्यांमध्ये सर्वाधिक आकडा होता. आतापर्यंत तिथे ३५६५ लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी भारतीय नागरिक राहतात. यामध्ये H1 आणि L1 व्हिसावर काम करणारे लोकही आहेत. याशिवाय स्टुडंट व्हिसावरही काम करणारे विद्यार्थी लाखांच्या घरामध्ये आहेत. चीननंतर सर्वाधिक भारतीय विद्यार्थी अमेरिकेमध्ये शिक्षण घेतात.

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी अमेरितेमध्ये शाळा, कॉलेज बंद करण्यात आले आहेत. यामुळे जवळपास २.५ लाख भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांच्या मदतीसाठी भारतीय हॉटेल मालक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

भारतीय हॉटेलमालकांनी या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध केली असून त्यांना रोजचे जेवणही दिले जात आहे.

अमेरिकेपेक्षा युरोपमध्ये या व्हायरसने कहर केला असून या खंडावर ५०२०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ६,७५,५८० लोक संक्रमित झाले आहेत. तर इटलीमध्ये सर्वाधिक १५८७७ लोकांचा मृत्यू झाला असून स्पेनमध्ये १३०५५ लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये ८०७८ लोकांचा तर ब्रिटनमध्ये ४९३४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

स्पेनमध्ये गेल्या चार दिवसांपासून मृत्यूंची संख्या कमी झाली आहे. गेल्या २४ तासांत ६३७ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी एकाच दिवसात ९५० जणांचा मृत्यू झाला होता. फ्रान्समध्ये दिवसभरात ८३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

ईराणमध्ये २४ तासांत १३६ जणांचा बळी गेली आहे. यामुळे या देशातील मृत्यूंची संख्या ३७३९ झाली आहे. तर रुग्णांची संख्या ६०००० झाली आहे.